नागपूर (Nagpur) : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण तयारी केली असून या पार्श्वभूमीवर शहरासाठी राज्य सरकारने तिजोरी उघडल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधींचा वर्षाव गेल्या दोन महिन्यांत केला आहे. राज्य सरकारने नागपूर शहरावर कृपादृष्टी दाखवत 800 कोटींचा धनवर्षाव केला. ई-बस, इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रकल्पांना हिरवी झेंडी दाखवली. या प्रकल्पांना त्यांनी तत्काळ निधीही मिळवून दिला. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षानी 45 खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमापुढे नमुद केले त्यादृष्टीने भाजप व मित्र पक्षांची वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने केवळ ऑक्टोबर महिन्यात महापालिकेला 666 कोटी रुपये दिल्याचे महापालिकेतील वित्त व लेखा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नमुद केले. याशिवाय नोव्हेंबरमध्ये दिक्षाभूमीसाठी दोनशे कोटी रुपये दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराला 250 ई-बस देण्याची घोषणा केली होती. त्यांनी यासाठी 137 कोटी रुपये मंजूर केले होते. हा निधी महापालिकेला मिळाला.
याशिवाय शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे आणखी गडद करण्यात येणार आहे. सिमेंट रस्ता टप्पा चारसाठी 300 कोटी रुपये महापालिकेला मिळाले. गणेश मूर्ती विसर्जनासाठी तलावांमध्ये बंदी करण्यात आली. गणेश भक्तांसाठी कृत्रिम तलावाचा पर्याय असून यासाठी राज्य सरकारने 31 कोटी 90 लाख रुपये दिले आहेत. 10 कोटी रुपये जुनी मंगळवारी येथील ज्ञानेश्वर मंदिरासाठी देण्यात आले आहे. याशिवाय शहरातील वाहतूक व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम उभारली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने 197 कोटी 63 लाख रुपये महापालिकेला दिले. यातील 137 ई-बसेस, इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम, कृत्रिम तलावासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सिमेंट रस्त्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सुत्राने नमुद केले. हे प्रकल्प महापालिका करणार असून नासुप्रलाही दीक्षाभूमीसाठी दोनशे कोटी रुपये देण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडूनही निधीचा ओघ :
अमृत 2.0 अभियानांतर्गत महापालिकेच्या 957 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पास केंद्र शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 25 टक्के अर्थात 239 कोटी 25 लाख, राज्य सरकारकडूनही 239 कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. महापालिका या प्रकल्पावर 50 टक्के अर्थात 478 कोटी 51 लाख रुपये खर्च करणार आहे.
अशाप्रकारे प्रकल्पांना मिळाला निधी :
250 ई-बस - 137 कोटी
सिमेंट रस्ता टप्पा चार - 300 कोटी
कृत्रिम तलाव - 31 कोटी 90 लाख
जुनी मंगळवारी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर - 10 कोटी
इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टीम - 197 कोटी 56 लाख
दीक्षाभूमी - 200 कोटी