नागपूर (Nagpur) : महामेट्रोने (MahaMetro) तयार केलेला वर्धा रोडवरील डबल डेकर पूल व तीन स्टेशनची आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. यानिमित्त महामेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वीही महामेट्रोने मेट्रो प्रकल्पासाठी अनेक पुरस्कार पटकावले असून, रेकॉर्ड बुकमध्ये नोंदीची घटना मैलाचा दगड ठरली आहे.
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाची स्तुती आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाते. आता आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या प्रकल्पातील डबल डेकर उड्डाणपूल व स्टेशनची नोंद झाली. विशेष म्हणजे एकाचवेळी दोन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने महामेट्रो प्रशासनात आनंदाचे वातावरण आहे. वर्धा रोडवरील डबल डेकर उड्डाणपूल सिंगल कॉलमवर उभा आहे. पहिल्या मजल्यावरून सामान्य वाहतूक तर दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावत आहे. याशिवाय जमिनीवरूनही सामान्य वाहतूक सुरू झाली. त्यामुळे नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.
विशेष म्हणजे या पूलासाठी भूसंपादनाची गरज पडली नसल्याने बांधकामाचा खर्चही कमी झाला. याशिवाय याच मार्गावरील छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशन उत्तम अभियांत्रिकीचा नमुना आहे. या तिन स्टेशनचीही आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे यापूर्वीही २०१७ मध्ये मेट्रोने तयार केलेल्या मानवी साखळीची नोंद घेण्यात आली आहे. या मानव शृंखलेत महामेट्रोचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि इतर नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.