नागपूर (Nagpur) ः भांडेवाडीत कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने मोठे ढिगारे तयार झाले आहे. गेल्या १२ दिवसांपासून संततधार पावसाने हा कचरा चिंब झाला असून, कुजल्याचे दिसून येते. यातील घाण पाणी लागूनच असलेल्या वस्त्यांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांचे जगणे कठीण झाली आहे. रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त व आरोग्याला धोकादायक घाण पाणी असून त्यातूनच चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
विशेष म्हणजे भांडेवाडीचा काही भाग स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट असून लागूनच असलेल्या भागात नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. शहरातील भांडेवाडी परिसर डम्पिंग यार्डमुळे कायमच प्रशासनाकडून दुर्लक्षित करण्यात आला. आजही रिंगरोडपासून भांडेवाडीकडे जाण्यास वळण घेतल्यास खेड्यापेक्षाही वाईट स्थितीतील रस्त्यांनी पुढे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार होत आहे. रस्त्यांमध्ये खड्डे, त्यानंतर एका बाजूच्या रस्त्यांचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्या भागात नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. डम्पिंग यार्डच्या प्रवेशद्वाराजवळ अजूनही रस्ता तयार होत आहे. खड्ड्यातून निघताना वाहनातील काही कचरा रस्त्यात पडतो. त्यावरून इतर वाहने जात असल्याने पावसात हा कचरा सडतो. अर्थात रस्त्यावरून जातानाही दुर्गंधी कायम आहे. याच डम्पिंग यार्डच्या भिंतीला लागून सूरजनगर आहे. मागील बाजूला अंतुजीनगर, अब्बुमियानगर आदी आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याला महापालिकेने हरताळ फासला. त्यामुळे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहे. हे कचऱ्याच्या ढिगारे गेल्या बारा दिवसांपासून संततधार पावसामुळे चिंब झाले आहे. या कचऱ्यात ढिगाऱ्यातील घाण पाणी आता संरक्षक भिंतीला पडलेल्या छिद्रातून सूरजनगर वस्तीत शिरत आहे. या घाण पाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहे. केवळ पाणीच नव्हे तर त्यातून विविध अक्षरशः चिखलासारखा स्त्राव बाहेर पडत आहे. हे सर्व रस्त्यांवर जमा होत असल्याने या घाणीच्या चिखलातून येथील नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे.
एवढेच नव्हे अनेकांच्या घराबाहेर दारातही हा घाणयुक्त चिखल येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या घाणीतून नको ते रसायन दुर्गंधीद्वारे नाकात शिरत आहे. परिणामी या वस्तीत घरोघरी नागरिक बेडवर दिसून येत आहे. भांडेवाडीच्या याच भागाला लागून स्मार्ट सिटी तयार होत आहे. एकीकडे स्मार्ट सिटी व दुसरीकडे नरकपुरी, अशी स्थिती आहे. या नरकपुरीतून कधी बाहेर पडणार, असा प्रश्न या भागातील हजारो नागरिक विचारत आहेत.