नागपूर (Nagpur) : रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे (Potholes) नागपूरकरांसाठी डोकेदुखी झाली आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठ खड्डे पडतात. ते कितीही वेळा दुरुस्त केले तरी या खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ काही सुटत नाही. त्यामुळे आता महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) डांबरी रस्त्यांवर व्हाईट टॅपिंग (White Taping) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांवर दीर्घकाळ खड्डे पडणार नाहीत, असा दावा नागपूर महापालिकेच्या आयुक्तांनी केला आहे. त्यासाठी २० कोटींचा निधी अर्थसंकल्पात राखीव ठेवण्यात आला आहे.
नागपूर महापालिकेचा 2022 -23साठीचा अर्थसंकल्प बुधवारी (ता. १३) महापालिका आयुक्तांनी सादर केला आहे. 2 हजार 669 कोटींच्या खर्चाचे अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपल्यामुळे आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्यामुळे निवडणूक होऊ शकलेली नाही. त्यामुळे महापालिकेत प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका आयुक्तांनीच आज हे अर्थसंकल्प सादर केले.
बारा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या, मात्र वर्दळ असलेल्या रस्यांवर व्हाईट टॅपिंग केले जाणार आहे. या अंतर्गत डांबरी रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटचा थर दिला जाणार आहे. अशा प्रकारचे रस्ते दीर्घकाळ टीकतात. पावसाच्या पाण्याने खराब होत नाही. त्यामुळे खड्डेही पडत नाही. एकप्रकारचे कमी बजेटमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.
महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांवरच अधिक भर दिला आहे. त्यातही सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी विशेष तरतूद केलली आहे. डांबरी रस्ते जास्त काळ सुस्थितीत राहात नाहीत. त्यामुळे शहरातील काँक्रिट रस्त्यांसाठी ४७ कोटींची तरतूद केली आहे. रस्त्यांचा पृष्ठभाग सुस्थितीत रहावा यासाठी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी ५० कोटींची तरतूद आहे. मुख्य रस्त्यांवरील पादचारी मार्ग, मेनहोल व नाली दुरुस्ती करणे, मेनहोल कव्हर्स आदी कामांसाठी १२ कोटी प्रस्तावित आहेत.
अर्थसंकल्पात सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्प टप्पा २ व ३ अंतर्गत टप्पा २ मधील एकूण ५९ रस्त्यांपैकी ५४ रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासठी ३२४ कोटींचा निधी राखीव आहे. टप्पा ३ ची प्रकल्प राशी ३०१ कोटी ६७ लाख रुपये एवढी आहे. ३९ रस्त्यांचे बांधकाम करणे प्रस्तावित असून १६ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. १२ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. टप्पा १ मध्ये सुटलेल्या १० चौक व फुटपाथच्या सुधारणेसाठी ३२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पावर आतापर्यंत १६२ कोटी खर्च झाला असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.