नागपूर (Nagpur) : नवी दिल्लीतील केंद्रीय नगर विकास विभागाच्या स्मार्ट सिटी मिशन कार्यालयाने नागपूर स्मार्ट सिटीच्या थांबविण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ७२ कोटींच्या विकास कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा-भरतवाडा, पुनापूर, पारडी प्रकल्प राबविला जात आहे. यात मौजा-पुनापूर, भरतवाडा व पारडी येथील वस्त्यातील रस्ते, सर्व मैदानाचे सौंदर्यीकरण, पुनापूर भागात फायर स्टेशन, स्किल डेव्हलपमेंट सेंटर व अन्य असे ७२ कोटींची विकासकामे टेंडर प्रक्रियेत असताना केंद्र सरकारकडून देशातील सर्व स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश मार्चच्या पूर्वी काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या विकासकामाचे कार्यादेश होऊ शकले नाहीत. परिणामी टेंडर रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ही बाब समजली. त्यांनी केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र देऊन मुदतवाढ देण्याची विनंती केली. तसेच नवी दिल्ली येथे केंद्रीय सहसचिव व स्मार्टसिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांची भेट घेतली होती. उद्यान व मैदानाचे सौंदर्यीकरण, स्मार्ट पोलिस स्टेशन, ई-टॉयलेट, फायर स्टेशन, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, अंतर्गत रस्ते ही कामे आता लवकरच मार्गी लागणार आहेत.