नागपूर (Nagpur) : पंधरा वर्षांपूर्वी फ्लॅट स्कीम विकल्यानंतर आता बिल्डर एन. कुमार आणि फ्लॅटधराकांमध्ये इमारतीवरच्या टेरेसच्या मालकीवरून वाद सुरू झाला आहे. हा वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला आहे.
वादग्रस्त बिल्डर एन. कुमार यांच्या विरोधात खामला पूनम प्राईड फ्लॅट स्किमधील रहिवाशांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. इमारतीत अनधिकृतपणे माणसे घुसवून तोडफोड केल्या जात आहे, बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रयत्न केला जात असून, यापासून आम्हाला संरक्षण देण्याची मागणी येथील रहिवास्यांनी पोलिसांकडे केली आहे.
एन. कुमार यांनी खामला परिसरात २००५ मध्ये १८ फ्लॅट असलेली इमारत बांधली होती. यातील सर्वच फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. येथील रहिवासी एस.व्ही. सुळे, डॉ. के. एन. इंगळे आणि डॉ. मोहम्मद नजर यांनी २००८ मध्ये आश्वासनांचा भंग तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने ग्राहक न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अनुप मरार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करून रहिवाशांना न्याय द्यावा अशी विनंती केली होती. हा वाद सुरू असतानाच बिल्डर एन. कुमार यांनी सुधारित नकाशा सादर करत अधिकचा एफएसआय घेऊन बांधकाम करण्याचा घाट घातला आहे. या मुद्द्यावरून रहिवासी आणि बिल्डर यांच्यात आता खडाजंगी सुरू आहे.
फ्लॅट विकले असले तरी टेरेस आमचाच आहे. त्यावर बांधकाम करण्याचा अधिकार आहे. डीड ऑफ डिक्लेरेशन आणि मंजूर ड्रॉइंगमध्ये याच समावेश असल्याचा दावा बिल्डर एन. कुमारकडून करण्यात आला आहे. मात्र अशा अनेक प्रकरणात न्यायालयाने बिल्डरला फटकारले आहे. सदनिकांची विक्री केल्यानंतर त्यावर ताबा घेता येत नाही. रहिवाशांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय १५ वर्षांनंतर फ्लॅट विकसित करण्याचा किंवा वाढवण्याचा बिल्डरला अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही बिल्डरतर्फे दादागिरी केली जात असल्याने सोसायटीचे सुभदीप बेरा, भाविक पारिख यांनी मंगळवारी प्रताप नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.