नागपूर (Nagpur) : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एनएमआरडीए) शहरात मोठ्या प्रमाणात घरकुले तयार केली. या घरांसाठी लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान देण्यात येत आहे. परंतु अनुदानानंतरही पाचशेवर घरे रिकामीच असल्याने लाभार्थ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
एनएमआरडी शहराच्या विविध भागांमध्ये 4 हजार 345 800 लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबा देण्यात आला. या योजनेसाठी लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दीड तर राज्य सरकारकडून एक लाख रुपये, असे अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. अनुदानानंतर 545 घरे रिकामे आहेत. यासाठीही लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. परंतु बँकाचा अटीमुळे अनेकांनी माघार घेतल्याचे समोर आले आहे. या योजनेला आठ वर्षे पूर्ण झाली. परंतु अद्यापही लाभार्थ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने या घरकुलांमधील सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
याशिवाय एनएमआरडीए जिल्ह्यात नऊ तालुक्यात ही योजना राबवित आहे. यासाठी 20 हजार 468 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना अनुदान वितरित करायचे असल्याचे एसएमआरढोने म्हटले आहे. आतापर्यंत 7 हजार 70 लाभार्थ्यांच्या घराच्या पायापर्यंतचे काम पूर्ण झाले. 3 हजार 590 लाभार्थ्यांचे स्लॅबपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. 2 हजार 441 लाभार्थ्यांच्या घराचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या लाभार्थ्यांना 178 कोटी 99 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. 7 हजार 829 लाभार्थ्यांना कामाचे कायदेश देण्यात आले असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करावे, असे आवाहन एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.