नागपूर (Nagpur) : एकीकडे मेडिकल, मेयो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी राज्य सरकार घोषणांचा पाऊस पाडते. तर दुसरीकडे हाफकिनसारख्या मंडळाला खरेदीचे अधिकार दिल्यानंतरही खरेदी होत नाही. हाफकिन मागील पाच वर्षांपासून औषधांसह खरेदी करण्यात नापास झाले. यामुळे मेडिकल, मेयो आणि सुपर स्पेशालिटसहित राज्यभरातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा 396 कोटीचा निधी परत गेला, असून हाफकिनने हा निधी रिझर्व्ह बँकेत जमा केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यात मेडिकलचे 60 कोटी, सुपर स्पेशालिटीतील 11 कोटी तर मेयोच्या 20 कोटीचा निधी परत रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत गेल्याने या संस्थांचा विकासाला थांबा लागला आहे.
मेडिकलमध्ये गडचिरोलीपासून तर मेळघाटातील अडीच ते तीन हजारावर गरीब कॅन्सरग्रस्त उपचारासाठी येतात. कॅन्सरग्रस्तांसाठी मेडिकल वरदान ठरते. याच हेतूने 2017-18 मध्ये सामाजिक न्याय विभागाने मेडिकलला 20 कोटी तर आदिवासी विकास विभागाने 3 कोटी असा एकूण 23 कोटीचा निधी मेडिकलच्या तिजोरीत जमा झाला. या निधीतून कॅन्सरग्रस्तांवरील उपचारासाठी 'लिनिअर एक्सिलिरेटर' खरेदी करण्यात येणार होते.
तर हृदयावरील एन्जिओप्लास्टी होतील बंद....
सध्या विप्रो कंपनीचे 4 कोटी 75 रुपयांचे कॅथलॅब यंत्र २०१२ पासून सुपरमध्ये सुरु आहे. १२ वर्षात सुपरमध्ये सुमारे 30 हजार केन्जिओग्राफीच्या तर 15 हजार एन्जिओप्लास्टीच्या प्रक्रिया झाल्यात. मात्र ऑगस्ट 2022 मध्ये कॅथलॅब कालबाह्य झाले आहे. नवीन कॅथलॅब खरेदीत हाफकिन नापास झाल्याने गरिबांचे हृदय 666 सांभाळण्याचे काम कालबाह्य कॅथलॅबवर सुरु आहे. नवीन कॅथलॅब खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 5 कोटी 67 लाखांचा निधी मिळाला होता. मात्र हा निधा आता हाफकिनने रिझर्व्ह बँकेत जमा केला. आगामी काळात कालबाह्य झालेले कॅथलॅब बंद पडले तर याचा फटका गरिबांच्या हृदयाला बसणार असून हृदयावरील एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीच्या प्रक्रिया थांबतील.
तिजोरीत पडून आहे निधी :
मेडिकल - 60 कोटी
मेयो - 28 कोटी
सुपर - 11 कोटी