नागपूर (Nagpur) : लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे अनेक विकासकार्य हे प्रलंबित होते. मात्र आता थाबंलेल्या कामांना गति मिळाली आहे. सोबतच दीक्षाभूमीच्या विकास कामांना सुद्धा वेग आला आहे. मंजूर झालेल्या 214 कोटींच्या विकास आराखड्यापैकी 110 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून पहिल्या टप्प्यातील भूमिगत पार्किंगचे काम सुरू झाले असून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तराचा विकास करण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका अॅड. शैलेश नारनवरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने यासाठी 214 कोटी रुपये मंजूर केले आहे. सुनावणीदरम्यान नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) ने दाखल केलेल्या शपथपत्रानुसार नोएडा येथील डिझाइन असोसिएट्स इनकॉर्पोरेशनने दीक्षाभूमीच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये स्तुप विस्तारीकरण, सीमा भिंत, गेट कॉम्प्लेक्स व वॉच टॉवर पार्किंगसाठी बेसमेंट, शौचालये, पिण्याचे पाणी, कार्यक्रम व्यासपीठ, जलसाठा टाकी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी विकासकामांचा समावेश आहे. ही विकासकामे दोन टप्प्यात होणार असून एनएमआरडीएची या कामांसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सामाजिक न्याय विभाग या कामाची देखरेख करीत आहे. विकास आराखड्यानुसार राज्य सरकारकडून या कामांसाठी सुरुवातीला 40 कोटी व नंतर 70 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ऑक्टोबर 2024 पर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचा विश्वास प्रशासनाने दिला आहे. सध्या भूमिगत पार्किंगचे कार्य जोरात सुरू आहे.
सध्या चित्रकला महाविद्यालयाच्या बाजूच्या भागात भूमिगत पार्किंगचे काम प्रगतिपथावर असून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. यामध्ये 146 कार आणि 902 सायकल व स्कूटर पार्क करण्याची क्षमता असेल. याशिवाय प्रसाधने, अनामत कक्ष (येणाऱ्या अनुयायांसाठी लॉकरची सुविधा), प्रथमोपचार कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात येईल. वाहनतळाच्या छतावर बसण्याची जागा, विविध शोभेची झाडे व पदचर मार्ग असेल. पाऊस आला तर अनुयायी या भूमिगत स्थळाचा आसरा घेऊ शकतील. शिवाय कार्यक्रमासाठी सभामंचही असेल. मुख्य स्तुपाच्या चारही प्रवेशद्वारांचे नूतनीकरण, सांची स्तुपाच्या वास्तुकलेने प्रेरित 20 फूट रुंद व 66 फूट उंच चार तोरण द्वार. स्तूपाभोवती दगडी परिक्रमा व दगडी पदपथ. स्तुपाच्या चारही बाजूला हिरवेगार प्लांटर, 11,316 चौरस फुटांचे व्याख्यान केंद्र आणि 5,466 चौ. फुटांचे खुले सभागृह, सभामंच 66 फूट लांब, 54 फूट रुंद व 15 फूट उंचीचे दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम, 33 फूट रुंद व 30 फूट उंचीचे दोन मुख्य प्रवेशद्वार, त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली व पोलिस नियंत्रण कक्ष 5,11,742 चौ. फुटांचे हरितक्षेत्र, यासह प्रसाधने, विद्युतीकरण, सौरऊर्जा यंत्रणा व मलनिसःरण केंद्र, 37 फूट उंचीचे अशोक स्तंभ असणार आहेत. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी भूमिगत पार्किंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. वेळोवळी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. ऑक्टोबरपूर्वी पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
सामाजिक न्याय विभाग
सध्या दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे वेगवेगळे भ्रम पसरविले जात आहेत. जागा कमी होईल, स्मारकाला धोका होईल, मेट्रोच्या पार्किंगला जागा दिल्याचे संदेश पसरविले जात आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीने यापूर्वीच दीक्षाभूमीच्या विकास कामांवर समाधान व्यक्त करीत स्मारकाला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अशाप्रकारच्या संभ्रमित संदेशावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन समितीने केले आहे.