अमरावती (Amravati) : येथील ब्रिटिशकालीन मध्यवर्ती कारागृहात विविध कामासाठी गृह विभागाने 19 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात महत्त्वाचे म्हणजे कारागृह परिसराला संरक्षण भिंत साकारली जाणार असून, बाह्य रस्ते निर्मितीसह एकूणच परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार आहे. तसेच, 204 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कारागृह परिसराला वेढा असणार आहे. आता कारागृह अधिकारी-कर्मचारी, कैद्यांच्याही बारीकसारीक बाबी कॅमेऱ्यात कैद होणार आहे.
कारागृह प्रशासनाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर रिक्त पदभरती, बंदिजनांसाठी पायाभूत सुविधा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवासस्थानांचे प्रश्न मार्गी लावल्यास प्राधान्य दिले आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या बाह्य भागात नागरीवस्ती असल्यामुळे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा मोठा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या रिंगरोडवरून गांज्याचे बॉल निरंतरपणे येत असल्याचे उघडकीस आले आहे. नेमके हे गांज्याचे बॉल नेमके कोणासाठी येतात, बंदिजनांपर्यंत कोण पोहोचतो? हा संशोधनाचा विषय आहे. तथापि, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी एकूणच परिसराला आवार संरक्षण भिंत बांधकाम 13, 77, 80, 556 रुपये निधी, बाह्य रस्ते आणि विद्युतीकरणासाठी 5,46,55, 694 ईतक्या पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून निधीला देखील 7 फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनंतर प्रत्यक्षात निधी मिळाल्यानंतर होणाऱ्या अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.
204 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वेढा :
कारागृहाच्या आत आणि बाहेरील भागात बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आता 204 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्याकरिता स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. अधिकारी, कर्मचारी, बंदिजन यासह एकूण महत्त्वाच्या घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. प्रवेशद्वारापासून तर आतील परिसर, मागील बाजुकडील महामार्गावर, चांदूर रेल्वे मार्ग, वडाळी रस्ता, मुख्य दर्शनी भाग, वसाहतीचा भाग, शेतीचा परिसर आदी महत्त्वाचे परिसर सीसीटीव्ही कॅमे-यांत कैद होणार आहे.