नागपूर (Nagpur) : नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत 55.35 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. त्याअंतर्गत पुणे शहराच्या धर्तीवर नागपुरातही महाराष्ट्र गौरव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात त्यांच्या जीवनावर आधारित प्रसंग दर्शविणारा शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
एनआयटीचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली एनआयटीच्या मुख्यालयात ही बैठक झाली. शिवसृष्टी प्रकल्पात नवीन पिढीला महाराजांच्या जीवनशैलीची जाणीव व्हावी, या उद्देशाने महाराजांकडून संपादित करण्यात आलेल्या 14 किल्ल्यांची प्रतिकृती, दहा लाइट व राउंड शो, महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग, छायाचित्रे व स्थळचित्रे आदींचा यात समावेश राहणार आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्प राबविण्याकरिता नासुप्र ही संस्था कार्यान्वयीन यंत्रणा असेल. यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याचे अधिकारही नासुप्र सभापतींना बैठकीत देण्यात आले.
दाभा येथे वीज उपकेंद्र जागा हस्तांतरण :
महावितरणच्या मंजूर सुधारित वितरण क्षेत्र योजनांतर्गत नागपूर मेट्रो रिजनमध्ये प्रस्तावित 33/11 केव्ही उपकेंद्रासाठी दाभा येथील जागा हस्तांतरण करण्याची विनंती महावितरणने केली होती. यासोबतच एनआयटीच्या मालकीची इंदोरा येथील उपकेंद्रकरीत आरक्षित जागेपैकी 1000 चौरस मीटर जागा महावितरणला उपकेंद्र बनविण्याकरीता दर निर्धारक समितीने ठरविलेल्या दरानुसार वाटप करण्यासही मंजुरी प्रदान करण्यात आली.
गोकुळपेठ मार्केटसाठी सल्लागार नियुक्त :
एनआयटी व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळपेठ मार्केट प्रकल्प राबविण्याकरिता शासनाने समिती गठित केली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 693.63 कोटीचा आहे. यासाठी प्रकल्प सल्लागार, व आर्थिक व्यवहार्यता सल्लागार म्हणून मे. हितेन अॅड असोसिएट्स यांची नियुक्ती केली. त्यांना प्रकल्प राशीच्या 2. 25 टक्के सेवा शुल्क अधिक 18 टक्के जीएसटी देण्यासही मंजुरी देण्यात आली.