अमरावती (Amravati) : चिखलदरा पेसा क्षेत्र असलेल्या मेळघाटातील जिल्हा परिषद शाळांवर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अशा 400 जागांवर महिनाभरात शिक्षण विभागाच्या वतीने ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असून यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. सोबतच यापूर्वी निवड झालेल्या 247 उमेदवारांना देखील या भरतीमध्ये संधी दिली जाणार आहे. यामुळे मेळघाटातील शिक्षक रिक्त पदांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
राज्यात पेसा क्षेत्रातील मेळघाटातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली आहेत. या रिक्त पदांमुळे अध्यापनकार्य रखडल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती देण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेने शासनस्तरावर लावून धरली होती. शिक्षण मंत्रालयाने या मागणीची दखल घेतली व तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया महिनाभरातच पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भरतीकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
247 जागांवर होणार भरती :
धारणीमध्ये 170 तर चिखलदरा तालुक्यात 130 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने भरतीमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे; परंतु सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शिफारसपात्र 247 उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी, अशा सूचना आहेत. तद्नंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षकपदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जाणार आहे.
कंत्राटी शिक्षकांना मिळणार 20 हजार मानधन :
कंत्राटी शिक्षकांना 20 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एक महिन्याच्या आताच करण्याचे शासनाचे आदेश असल्याने गुरुवारपासून शिक्षक विभागात या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकरे यांनी सांगितले.