भंडारा (Bhandara) : भंडारा जिल्ह्याच्या पर्यटनात मोलाची भर घालण्याची क्षमता असणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पातील (Gosikhurd Project) जलपर्यटनाच्या हालचाली आता वेगात सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी शुक्रवारी प्रकल्पस्थळी पाहणी केली. यामुळे जिल्हावासीयांच्या आशा उंचावल्या आहेत.
राज्य शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेला हा जलपर्यटन प्रकल्प असून स्थानिकांना रोजगाराची संधी यातून उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश बिदरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
केंद्रीय मार्ग निधीतून आंभोरा येथे सुरू असलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकामाची पाहणी त्यांनी केली. पुलाच्या भंडारा बाजूच्या पोचमार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी कामाच्या गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. गोसीखुर्द प्रकल्पाचे अभियंता शर्मा यांनी यावेळी प्रकल्पाविषयी माहिती दिली.
शिखर समितीसमोर सादरीकरण
गोसीखुर्द जलाशय येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नुकतीच राज्य शिखर समितीसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. गोसीखुर्द जलाशयात 45 किमी जलप्रवास पात्र आहे. नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन करण्यात येणार आहे.
देशातील सर्वोत्तम असा जलपर्यटन प्रकल्प जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शिखर समितीत देण्यात आल्यात. हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत आहे. याठिकाणी सुरु असलेला अंभोरा मंदिर विकास प्रकल्प आणि ना जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.