Gondia News गोंदिया : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) आता गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या महामार्गाच्या विस्ताराने गोंदिया ते मुंबई हे अंतर 8 ते 10 तास गाठणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार आहे. समृद्धीच्या मार्गाने जिल्ह्यात समृद्धी येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र आहे. यापैकी 1 लाख 80 हजार हेक्टरवर धानाची, तर जवळपास 12 हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. धानावर प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने धानाची विक्री करून मोकळे व्हावे लागते. परिणामी शेतकऱ्यांची फारशी आर्थिक प्रगती झाली नाही.
गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकरी ऊस, भाजीपाला, फळबागा लागवडीकडे वळत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे मोठ्या बाजारपेठेत पोहचविण्याच्या जलद सोयी नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही, पण शासनाने समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेत त्याच्या कामाला सुरुवात केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आशेचा किरण गवसला आहे. या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना जलद वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे.
भाजीपाला, दूध, फळे हे लवकर खराब होणारे घटक आहेत. त्यामुळे यांची जेवढ्या जलदगतीने वाहतूक होईल, तेवढे सोयीचे होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागपूर, मुंबई, नाशिकसह इतर मोठ्या बाजारपेठेत शेतमाल पोहचवून चार पैसे अधिकचे पदरात पाडून घेण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारा मार्ग ठरणार आहे. सध्या या महामार्गासाठी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामंपचातींमध्ये प्रकाशित केल्या जात आहेत.
जमिनीला आला सोन्याचा भाव :
समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यात येत आहेत. याचा मोबादला शेतकऱ्यांना मिळणार आहे, पण या प्रकल्पामुळे प्रकल्प बाधित झालेले शेतकरी दुसरीकडे जमिनी खरेदी करीत आहेत, तर या महामार्गामुळे जिल्ह्यात उद्योग धंदे स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे आतापासूनच हा महामार्ग जात असलेल्या परिसरात जमिनी खरेदी करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.
विमानतळसाठी होणार मदत :
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल हे प्रयत्नशील आहेत. कार्गोसेवा सुरू झाल्यास जिल्ह्यातील राइस मिल उद्योगाला संजीवनी मिळू शकते.
शिवाय कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा बिरसी विमानतळावरून शेतमाल बाहेर पाठवून अतिरिक्त नफा मिळविण्यास मदत होईल.