गोंदिया (Gondia) : देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या या इमारतीच्या लोकार्पणासाठी मुहूर्त सापडला असून, चर्चेला विराम लागला आहे.
स्थानिक ग्रामीण रुग्णालयांच्या जुन्या इमारतीला जवळपास 50 वर्षे झाले असून, ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. स्लॅबमधून पाणी गळते. याची दखल घेत माजी आ. संजय पुराम यांनी 2014 मध्ये आमदार असताना ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी प्रयत्न करून 12 कोटी 50 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला होता.
या नवीन इमारतीच्या आधारशिलेचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री परिणय फुके यांच्या हस्ते झाले होते. परंतु कंत्राटदाराने या इमारतीच्या बांधकामासाठी 4 वर्षे लावली. दोन महिन्यांपूर्वीच या इमारतीचे लोकार्पण आ. सहपराम कोरोटे यांनी रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगत केले होते. आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी या नवीन इमारतीला भेट दिली होती. भेट देऊन एक महिन्याच्या आत सर्व सुविधायुक्त नवीन इमारतीचे लोकार्पण होणार, असे कळविले होते. परंतु अजूनही काम पूर्णत्वास आले नाही. आता 26 ऑक्टोबरला या इमारतीचे लोकार्पण झाले.
नवीन इमारतीसाठी साहित्यच मिळाले नाही
रुग्णालयाच्या नवीन इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नसून, या इमारतीसाठी नवीन साहित्य कोणतेच प्रकारचे देण्यात आले नाही किंवा सर्व सुविधायुक्त मशीन व फर्निचर सुद्धा या इमारतीला अजूनपर्यंत मिळाले नाही. रुग्णालय सुसज्ज होण्यापूर्वीच लोकार्पण करण्याची एवढी घाई का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.