नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत (SRA) नारी, उप्पलवाडी येथील झोपडपट्टीधारकांसाठी बहुमजली इमारत बांधून देत गाळे उपलब्ध करून दिले. परंतु गेल्या सहा वर्षांपासून येथील नागरिकांना साधे पिण्याचे पाणीही नाही. सिवेजसाठी तयार करण्यात आलेली सेफ्टी टॅंक फुटली असून, सर्वत्र घाण व दुर्गंधी आहे. एवढेच नव्हे पथदिवेही दुरुस्त न केल्याने रात्रीच्या काळोखात येथील नागरिकांंना नसलेला रस्ता शोधावा लागत आहे. (Nagpur Municipal Corporation)
सहा वर्षांपूर्वी शहरातील विविध भागातील झोपडपट्ट्यांतील ५४४ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने नारी, उप्पलवाडी येथे बहुमजली इमारत तयार करून गाळे निर्माण केले. झोपडपट्टीतील रहिवाशांना नागरी संस्थेने गाळ्यांचे वाटप केले. परंतु त्यानंतर या नागरिकांना वाऱ्यांवर सोडले. मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी महापालिकेने त्यांना ॲप्रोच रोड तयार करून दिला नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनीचे जाळे, आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र यासारख्या प्राथमिक सुविधांपासूनही त्यांना वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. एवढेच नव्हे पावसाळ्यात रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून रस्ता काढावा लागतो. परिणामी नागरिकांचे हाल होत आहे.
येथे मलःनिस्सारणाचे जाळे नसून त्याऐवजी महापालिकेने टाकी बांधली. आता सर्व टाक्या काठोकाठ भरल्या आहेत. काही ठिकाणी ही टाकी फुटली आहे. घाण पाणी परिसरात पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधीसह येथील लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची समस्याही निर्माण झाली आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु महापालिकेने सातत्या दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी नगरसेवक मनोज सांगोडे, शीतल कुमरे, गोपी बोदेले, नरहरी वासनिक यांंनी केला आहे.
ताबापत्रही नाही
संतप्त नागरिकांनी नुकतीच महापालिकेवर धडकही दिली होती. या परिसरात पाच ते सहा बोअरवेल तयार करून द्याव्या, अशीही मागणी नागरिकांनी केली. महापालिकेने झोपडपट्टीधारकांना गाळे दिले. परंतु ताबापत्र दिले नाही. त्यामुळे या झोपडपट्टीधारकांमध्ये भीतीचेही वातावरण आहे. ताबापत्र देण्याची मागणी येथील रहिवाशी नागरिकांनी केली आहे.