नागपूर (Nagpur) : भाजपच्या कार्यकाळात एका मंत्र्याच्या आग्रहस्तावर नागपूरमधील अंबाझरी उद्यानाशेजारी प्रस्तावित करण्यात आलेल्या गुरुडा कंपनीचा ॲम्युझमेंट पार्क राज्यात सरकार बदलल्याने पुन्हा पुनर्जिवित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास असणारे आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या एका नेत्याने हा प्रस्ताव आणला होता. याकिरिता अंबाझरी उद्यानाशेजारची जमिनी राज्य सरकारने महापालिकेला दिली होती. विकासासाठी मुंबईच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. ही कंपनी कोणाची याचा अद्याप कोणालाच सुगावा लागला नाही. याच कंपनीने नागपूर मेसर्स गुरुडा अम्युझमेंट पार्क कंपनीला उपकंत्राट दिले होते. या कंपनीच्या संचालकांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्या जागेवर हा पार्क प्रस्तावित करण्यात आला होते तेथे शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक होते. ते दुर्लक्षित पडले होते. मात्र कंपनीने या स्मारकाच्या इमारतीवर हातोडा चालवल्याने सर्व वादग्रस्त प्रकरण समोर आले.
या दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. कंपनीतील काँग्रेसचे पदाधिकारी आणि पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार यांचे जुने राजकीय वैर आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पूर्ण ताकद लावली. काही आंबेडकरी नेत्यांनी स्मारक पाडल्याने आंदोलने केली. आंबेडकरी नेत्यांचा माजी पालकमंत्री नितीन राऊत काँग्रेसची सत्ता असताना काहीच करत नसल्याने रोष व्यक्त केला होता. नागपूर सुधार प्रन्यासच्या बैठकीत हा प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला.
फडणवीस सरकारने अंबाझरी येथील जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिली होती. पर्यटन मंडळाने गरुडा अम्युझमेंट पार्क आणि पीके. हॉस्पीटॅलिटी सर्व्हीसेस प्रा. लि. या दोन कंत्राटदार कंपन्यांशी करार करून दिला. राज्य शासनाने ४४ एकर जागा नागपूर महापालिकेकडे हस्तांतरित केली. त्यावेळी ४४ एकर जागेपैकी २४ एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकरिता व उर्वरित २० एकर जमीन उद्यानाकरिता देण्यात आली होती.
आता परत राज्यात युतीचे सरकार आले आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मित्रांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुडा ॲम्युजमेंट पार्क पुन्हा पुनर्जिवित होण्याची शक्यता आहे.