नागपूर (Nagpur) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे सर्व प्रकल्प कोट्यवधीचे आणि भव्यदिव्य असतात. नागपूरच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी त्यांनी फुटाळा तलाव परिसराला पर्यटन क्षेत्र करण्याची योजना आखली आहे. येथे १२ मजली फुड प्लाजा, १०० वाहनांसाठी पार्किंग आणि ४०० आसन क्षमतेचे दर्शक गॅलरी विकसित केली जाणार आहे. येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शोसुद्धा राहणार आहे. (Futala Lake Project Nagpur)
नितीन गडकरी यांनी शुक्रवारी या प्रकल्पाची पाहणी केली. यापैकी म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शोचे काम जवळपास झाले आहे. त्याचे ट्रायलही त्यांनी बघितले. सुप्रसिद्ध अभिनेत्री रेवती यांच्या कंपनीने हे फाऊंटन विकसित केले आहे. फुटाळा तलावाच्या रेकॉर्डेड कॉमेंट्रीला हिंदीमध्ये महानायक अभिताभ बच्चन आणि मराठीमध्ये नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे.
या दोन्ही अभिनेत्यांच्या आवाजात नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणार आहेत. हे कारंजे पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ दर्शक गॅलरी ही ४०० आसन क्षमतेची राहणार असून, फुटाळ्याच्या पुढेच बारा मजली फूड-प्लाझा, ११०० वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह उभारण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाची उद्घाटनापूर्वी गडकरी यांनी नागपूर शहरातील गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
केंद्रीय रस्ते निधी मधून ३० कोटी रुपये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला देण्यात आले असून फुटाळ्याजवळील विद्यापीठ उद्यानात देश-विदेशातील पुष्पांच्या जाती आणून येथील पुष्पविविधता वाढवण्यात येणार आहे. या कारंजाच्या निर्मितीसाठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपूरात आले असून, फाऊंटनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी गडकरी यांनी बघितली. या फाऊंटेनच्या निर्मितीसाठी नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो यांचे सहाकार्य लाभले आहे.