चंद्रपूर (Chandrapur) : गोंडपिपरी शहराला लागून असलेल्या डांबर प्लांटच्या चिमण्यामधून निघणाऱ्या धुराचा धोका लक्षात घेता गोंडपिपरी शहरातील डांबर प्लांट हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांनी तर चक्क आमरण उपोषणाचा इशाराही दिला.
कित्येक महिने लोटूनही ना उपोषण झाले, ना चौकशी. हा डांबर प्लांट येथून हटविला नाही. नागरिकांना डोकेदुखी ठरणारा हा डांबर प्लांट कधी हटविणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
चंद्रपूर - अहेरी राष्ट्रीय महामार्गावर गोंडपिपरी पोलिस ठाण्यासमोर पेट्रोल पंपालगतच डांबर प्लांट उभारण्यात आला. मशीनच्या चिमणीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघून नागरी वस्तीसह शेतपिकांवर पसरत आहे. ज्यामुळे शेतपिकाचे नुकसान होत आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.
डांबर प्लांटच्या चिमण्यांमधून निघणाऱ्या धुरीमुळे डोळ्यांची आग होणे, खोकला, दमा यासह श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी शहरातील डांबर प्लांट हटविण्याची मागणी केली. काहींनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.
सद्य:स्थितीत चौकशी समिती कागदावरच असल्याची चर्चा आहे. मात्र, डांबर प्लांट अजूनही त्याच जागेवर तोऱ्यात उभा असून नागरिकांना जणू वाकुल्या दाखवत आहे. गोंडपिंपरी शहरात उभारण्यात आलेल्या डांबर प्लांटची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पर्यावरण नियमाला तिलांजली
पर्यावरण नियमानुसार डांबर प्लांट उभारणी करताना नियमाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असते. हा डांबर प्लांट राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ आहे. लागूनच पेट्रोलपंप आणि नागरिकांची वस्ती व अनेक शेतकऱ्यांची शेती आहे.
यासह खराळपेठ जंगलसुद्धा लागूनच आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लागून असल्याने कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना सुद्धा या डांबर प्लांटला परवानगी मिळाली कशी हा मोठा प्रश्नच आहे.
वन्यप्राण्यांनाही आहे धोका
जंगलात वाघ, बिबट, हरीण, चितळ, ससा, रानडुक्कर, अस्वल यांसह अन्य वन्यजीवांचा अधिवास आहे. डांबर प्लांटमधून निघणाऱ्या धुरामुळे जंगल परिसरात राहणारे प्राणीसुद्धा असुरक्षित आहेत. ज्यामुळे वन्य प्राण्यांसह पर्यावरणाला धोका निर्माण होत असतानादेखील गोंडपिंपरी शहरात डांबर प्लांट उभारण्यात आल्याने तो हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.