Gadchiroli News गडचिरोली : सरकारच्या जलसंधारण व मृदा संवर्धन विभागाकडून वैरागड जवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पात्रात जुन्या नळ योजनेच्या जवळ 1.25 कोटी रुपये खर्च करून सिंचन बंधारा बांधला जात आहे. या बंधाऱ्यामुळे जलस्तर वाढून शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे. यापूर्वी कुरखेडा तालुक्याच्या कढोली येथे बांधलेल्या अशाच बंधाऱ्याची योजना मात्र फसली होती.
सरकारच्या योजना लोकोपयोगी असल्या, तरी त्या योजना राबवणारे हात जर स्वच्छ नसतील, तर त्या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहत नाही. याचे उदाहरण कुरखेडा तालुक्यातील कढोली-उराडी मार्गावरील मोहगाव नाल्यावरचा बंधारा आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून अशाच प्रकारचा बंधारा येथे बांधण्यात आला होता; पण त्या सिंचन बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी काही उपयोग झाला नाही.
कुरखेडा तालुक्यातील कढोली जवळून वाहणाऱ्या सती नदी पात्रात शिवकालीन कोल्हापुरी बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधल्याने त्या बंधाऱ्याचा जलसंधारणासाठी काही एक उपयोग झाला नाही, उलट नदी काठाची जमीन दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाते.
नदीपात्रालगत असलेली शेती दरवर्षी खरडून जात असल्याने शेतकऱ्यांचे जमीन क्षेत्र कमी होत आहे. हा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
यापूर्वीचा कोल्हापुरी बंधारा ठरला निरुपयोगी
वैरागड जवळून वाहणाऱ्या वैलोचना नदी पात्रात आता ज्या ठिकाणी सिंचन बंधाऱ्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. त्याच नदीपात्रात वरच्या भागात आठ-दहा वर्षांपूर्वी कोल्हापुरी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता.
त्या नदीपात्रातील सिमेंट बंधारा बांधण्याचा उद्देश चांगला होता. त्या ठिकाणी नळ योजनेच्या पाण्याची विहीर असल्याने योजनेसाठी वर्षभर पाणी उपलब्ध राहील, अशी अपेक्षा होती; परंतु तसे झाले नाही.
बंधारा कमिशनच्या भानगडीत अडकणार नाही ना?
यापूर्वी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा उन्हाळ्यात नळ योजनेसाठी बंधाऱ्याचा कोणताही उपयोग किंवा फायदा झाला नाही. उलट वैरागड येथे वाढीव पाणीपुरवठा योजना निर्माण करावी लागली. वैरागडच्या वैलोचना नदीपात्रात 1.25 कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधला जाणार हा सिंचन बंधारा कमिशनच्या भानगडीत तर फसणार तर नाही ना किवा जुन्या बंधाऱ्याची पुनरावृत्ती होऊ नये, त्याचा सिंचन सुविधेसाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.