नागपूर (Nagpur) : मुंबई-हावडा रेल्वेलाइनवर (Mumbai - Howrah Railway Line) गाड्यांसाठी दोनऐवजी आता तीन लेन तयार करण्यात येत असल्याने कामठी येथील कन्हान नदीवर तब्बल पाच पूल उभारले जात आहेत. सध्या थर्ड लाईन येथे टाकली जात असून त्यानंतर पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या पुलांवर सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कन्हान नदीवर पुलाचे बांधकाम जुलै महिन्यात सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जुन्या पुलावरील ताण कमी होईल. भविष्यात दळणवळणासाठी जुना मार्ग बंद करण्याची शक्यताही आहे. कामठी-कन्हानच्या मधून वर्धा नदीवर ब्रिटीशकालीन पूल आहे. तो अद्यापही वापरात आहे. या पुलाचे आयुष्यमान संपले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल पाडण्याची शिफारस करण्यात आली आहे. यावर अपघात होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या काळात सुमारे ३० कोटी खर्च करून दळणवळणासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
कोरोना काळात कामगार आपल्या गावी परतल्याने बांधकामास विलंब झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी दाखल घेऊन यापूर्वी दोनदा कंपनीला अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वी जानेवारी २०२२ पर्यंत वेळ देण्यात आली होती. परंतु काम पूर्ण होऊ शकले नाही. गडकरी यांनी मागील महिन्यात पुन्हा दुसऱ्यांदा कंपनीच्या कामावर रोष व निराशा व्यक्त करीत १० जुलैपर्यंतची वेळ दिली आहे.