यवतमाळ (Yavatmal) : यवतमाळ जिल्हातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी यवतमाळ औद्योगिक वसाहतीत पाच हजार कोटी रुपयांचा उद्योग येणार आहे. त्यातूनच अनेकांच्या हाताला काम मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. यवतमाळ येथून जवळच असलेल्या किन्ही येथे सोमवारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत व पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक एप्रिलपासून राज्यात 'शासन आपल्या दारी' हे अभियान राबविण्यात येत आहे. हा 17 वा कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या कालावधीत 16 लाख 21 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या शिंदे लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 601 कोटी इतकी आहे.
851 कोटींच्या कामांचे भूमिपूजन
जिल्ह्यातील 21 हजार शेतकऱ्यांना सौरद्वारे झटका मशीन, 75 मॉडेल शाळांची निर्मिती, समृद्धी महामार्गाला जोडणारा मार्ग, वैद्यकीय महाविद्यालयातील आवश्यक पदांना मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ यांनी केली. जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील 'एमआयडीसी'मध्ये व्ही तारा कपंनी येणार आहे. ही कपंनी जिल्ह्यात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. जिल्ह्यातील विविध कामांचे भूमिपूजनही यावेळी शिंदे यांनी केले.
यवतमाळ समृद्धी महामार्गाला जोडण्याचे निर्देश
पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकात राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत यवतमाळचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मॉडल स्कूलची निर्मिती व्हावी, शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात तातडीने भरावी, शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी झटका मशीन द्याव्यात, सिंचन प्रकल्पासाठी ठोस निधी द्यावा, वीजपुरवठ्यासह आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबाबत निर्णय घ्यावा तसेच आदिवासी समाज बांधवांची संस्कृती व इतिहास जोपासण्यासाठी बिरसा मुंडा वास्तुसंग्रहालय उभारावे आणि यवतमाळला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्ही देण्याची मागणी राठोड यांनी केली.
यवतमाळ समृद्धी महमार्गाशी जोडण्याबाबत एमएसआरडीसीला निर्देश देत असल्याचे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. 25 हजार शेतकऱ्यांना झटका मशीन, तसेच 75 मॉडल स्कूलच्या प्रस्तावालाही त्यांनी मान्यता दिली. वास्तुसंग्रहालयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही देत आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठीचे योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.