नागपूर (Nagpur) : बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्यांच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. नागपूरच्या क्रीडा संकुलाला राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला असून संकुलाचे अद्ययावतीकरण व नूतनीकरणासाठी 756.99 कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकासही मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
नागपूर विभागीय क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण व नूतनीकरण करून विदर्भातील युवकांना खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात ही दूरदृष्टी ठेवून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विभागाला सूचना केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हा प्रस्ताव क्रीडा विभागाने शासनाला सादर केला. नवीन सुविधेत आता ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, आर्चरी रेंज, हॉकी, फुटबॉल पॅव्हेलियन इत्यादी खेळांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. यातून विदर्भातील खेळाडू, प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी राज्य योजनेतून यापूर्वी 51.20 कोटी रुपये, जिल्हा नियोजन समितीकडून क्रीडांगण विकास योजनेस 12 कोटी असा एकूण 63.20 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. आता नागपूर विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरण व नूतनीकरणासाठी 683.79 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे नागपूर विभागीय क्रीडा संकुलास शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देऊन संकुलामध्ये नवीन सुविधा उभारण्यासाठी 746.99 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली, असे बनसोडे म्हणाले.
जागतिक पातळीवर लौकिक वाढेल : देवेंद्र फडणवीस
विदर्भामध्ये पायाभूत सुविधेच्या दृष्टिकोनातून एम्ससारखी आरोग्यासाठी अत्याधुनिक सुविधा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ट्रिपल आयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पाठोपाठ नव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वरूपात विकसित होणारे आपले विभागीय क्रीडा संकुल एक मानांकन ठरेल. इथल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षक व गुणवत्तापूर्ण क्रीडा सुविधा उपलब्ध होत असल्याने जागतिक पातळीवर क्रीडाक्षेत्रातही नागपूरचा लौकिक वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.