मुंबई (Mumbai) : बुलढाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, रमाई घरकुल आणि अल्पसंख्याक घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे बुलढाणा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आमदार श्वेता महाले यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा चौथ्या हप्त्याचा निधी तातडीने वितरीत करावा. चिखली शहरातील मंजूर 457 घरकुल बांधकामांना गती द्यावी. एकतानगरमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. पुनर्विकास करण्यासाठी हाउसिंग कॉम्प्लेक्ससाठी जागा शोधून पुनर्वसन गतीने करावे. चिखली उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचे करण्यासंदर्भात तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकाम प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात यावी.
चिखली नगरपालिका हद्दीतील रोहिदास नगर भूखंडावरील शासकीय आरक्षणाबाबत शंकांचे निरसन करून भूखंड वाटप आणि झोपडपट्टी पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव सादर करावा. चिखली एमआयडीसीसाठी जागा दिलेल्या भूखंड मालकांना पीएपी अंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील पळसखेड येथून चिखली, बुलढाणा व मलकापूर या शहरांना जोडणारा पोच मार्ग व महामार्गाचे काम सुरू करणे, खडक पूर्ण प्रकल्पास सुप्रमा मिळणे, पेरू संशोधन केंद्र व उद्यान विद्यालय सुरू करणे, येळगाव धरणाच्या स्वयंचलित गेट संदर्भात सुरक्षित उपाययोजना करणे, पेनटाकळी प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन कालबद्ध पद्धतीने करणे, कृषी पंप प्रलंबित जोडण्यासाठी निधी वितरित करणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.