नागपूर (Nagpur) : केरळमधील कोची (Kochi, Kerala) येथे आयोजित पंधराव्या अर्बन मोबिलीटी इंडिया राष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शक गटात महामेट्रोने (MahaMetro) दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. ‘मेक इन इंडिया’ (Make In India) ही थीम, अल्युमिनियम बॉडी कोच, नागपूर आणि पुणे येथे मालमत्ता विकास, आर्थिक शाश्वतता, पावसाचे पाणी साठवणे यासाठी महामेट्रोला पुरस्कृत करण्यात आले आहे.
पुरस्कार सोहळ्यात महामेट्रोतर्फे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कोची येथे तीन दिवसीय अर्बन मोबिलिटी राष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी पुरस्कार वितरण करण्यात आले. महामेट्रोने येथे स्टॉल लावला होता. ‘मेक इन इंडिया’ ही थीम असलेल्या या स्टॉलमधून अल्युमिनियम बॉडी कोचची माहिती, नागपूर आणि पुणे येथे मालमत्ता विकास, आर्थिक शाश्वतता, पावसाचे पाणी साठवणे याबाबत माहिती देण्यात आली होती.
मेट्रो प्रकल्पाची गरज समजावून सांगण्यासाठी मेट्रो संवाद, नियो मेट्रो प्रकल्प, तसेच महामेट्रोने आजवर मिळवलेल्या विविध पुरस्काराचे छायाचित्रेही प्रदर्शित करण्यात आली होती. परिषदेच्या तीनही दिवस या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वीही मेट्रोला विविध पुरस्कार मिळाले आहेत.