नागपूर (Nagpur) : पारशिवनी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असल्यामुळे रुग्णांना नागपूर येथे जावे लागते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पारशिवनी शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येते शासकीय कार्यालय आहेत. त्याचबरोबर येथे ग्रामीण रुग्णालयात असून या रुग्णालयात अनेक रुग्ण ग्रामीण भागातून येतात. मात्र ग्रामीण रुग्णालय पाहिजेत तेवढ्या सुविधा पुरवण्यात सक्षम नसल्याने येथील रुग्णांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात खासगी उपचारासाठी जावे लागते. त्यात रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक झळ तर सोसावीच लागते. सोबत वेळेवर उपचार मिळाले नाही तर मृत्यूची भीती कायम असते. पारशिवनी तालुक्यात अति दुर्गम भागात आदिवासी बांधव वास्तव्यास असून त्यांना उपचाराकरिता पारशिवनी व्यतिरिक्त दुसरे आरोग्य उपचाराचे ठिकाण नाही. शहरातही योग्य उपचार, शस्त्रक्रिया झाली नाही तर नागपूरशिवाय पर्याय नाही.
तालुक्यात 112 लहान मोठी गावे आहेत. ग्रामीण रुग्णालयात गंभीर आजाराचे, अपघातग्रस्त रुग्ण नियमित येतात. लोकसंख्येच्या प्रमाणात येथील ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सोईसुविधा आहेत. उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक पातळीवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया, सिझर, सिटी स्कॅन, क्ष किरण, डोळ्यांचे ऑपरेशन, लहान बालकांचे रोगनिदान तथा मागदर्शन, व इतर आजारांवर उपचार मिळण्याची शक्यता आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असल्यामुळे रुग्णांना नागपूर येथील शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते.
पारशिवनी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास अनेक सुविधा मिळतील. येथील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी आदिवासी नेते जमिल शेख यांनी केली आहे. लहान मोठ्या शस्त्रक्रिया तालुक्याच्या इस्पितळात झाल्यास नागपूर व इतर खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे शहरात उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता आहे. ती राज्य सरकार पूर्ण करणे अगत्याचे आहे. अशी माहिती डुमन स्थानिक रहिवासी चकोले यांनी दिली.