नागपूर (Nagpur) : राज्य सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (GMC, Nagpur) 550 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून वैद्यकीय संकुलातील रस्त्यांसह इमारतींची डागडुजी व रंगरंगोटी आदी विविध योजनांवर काम केले जात आहे. काही कामे सुरू झाली आहेत. ही संस्था माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ही माझी जन्मभूमी आहे, चिरकाल टिकणारे काम या संस्थेकडून सुरू आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कौतुक केले.
महाराष्ट्रासह मध्य भारताच्या अनेक राज्यांचे विश्वासार्ह, खात्रीलायक, किफायतशीर उपचाराचे केंद्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल - Medical) अमृतमहोत्सव उद्घाटन सोहळा मेडिकलच्या मैदानावर 1 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला.या उद्घाटन सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.
कॅन्सर इन्स्टिट्यूट, डेंटल कॉलेजची नवीन इमारत, जुन्या नर्सिंग कॉलेजच्या जागी नवीन इमारत, अत्याधुनिक डिजिटल सभागृह, मुलींसाठी 450 खोल्यांचे वसतिगृह, अपघातग्रस्त विभाग ते ट्रॉमा सेंटर दरम्यान स्काय वॉक, प्रवेशद्वार, नवीन ग्राउंड, आधुनिक अतिथीगृह बांधण्यात येणार आहे. या सर्वांचे भूमिपूजन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य सुविधेत होणारी असमानता दूर करा
या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सर्व अजी - माजी डॉक्टरांच्या कामाचे कौतुक करत त्यांना अभिनंदन दिले. सोबतच म्हणाल्या की, GMC च्या डॉक्टरांनी राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावर पर काम करून, अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. आताही डॉक्टरांनी आरोग्य सुविधेत होणारी असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
यासोबतच त्यांनी सरकारचे अभिनंदन करत आयुष्मान भारत योजना, जन आरोग्य योजना आणि इतर योजनांचे कौतुक करत त्या लोकांपर्यंत पोहचण्यात यश येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.