नागपूर (Nagpur) : नागपूर विमानतळाचा विस्तार व विकास करण्याचे टेंडर आधीच काढण्यात आले होते. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यात सुमारे दोन वर्षांचा वेळ गेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळेच नागपूरच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय करण्यात मार्ग मोकळा झाला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील ७६०० कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणाचा कार्यक्रमापूर्वी ते बोलत होते.
हरियाना विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे उत्साह वाढला आहे. महाराष्ट्रातही ‘फेक नॅरेटीव्ह’ संपला असून आता देशाचा मूड बदलला असल्याचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केले. हे त्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळेच कालपर्यंत ‘हम साथ साथ है’ म्हणणारे ‘हम तुम्हारे है कौन’ असे म्हणू लागले असल्याचा हल्ला महाविकास आघाडीच्या नेत्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हरियानाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. इंडिया आघाडीने विजयाची तयारी केली होती. केव्हा एकदा निकाल जाहीर होतो आणि भाजपवर हल्ला करतो याची तयारी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी करून ठेवली होती. ते आता तोंडघशी पडले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
आपण अर्थमंत्री असताना राज्यात आठ नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यापैकी पाच विदर्भात होऊ घातले आहे. यात गडचिरोली, भंडारा, वाशीम, बुलडाणा, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. नव्या मेडिकल कॉलेजच्या निर्मितीमुळे महाराष्ट्रातील मेडिकल सीटमध्ये मोठी वाढ होईल आणि त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.
नागनदीचे काम सुरू झाले आहे. पोहरा नदीसाठी साडेसातशे कोटी रुपये मंजूर झाले आहे. एकट्या नागपूर शहरात बारा ते तेरा हजार कोटींच्या कामाला सुरुवात होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र, अडीच वर्षे सत्तेवर असताना एकही वसतिगृह सुरू केले नाही. महायुती सरकारच्या प्रयत्नातून ५२ वसतिगृह आज सुरू होत आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी हक्काच स्थान यामुळे मिळणार आहे. ज्या ठिकाणी वसतिगृह नाही तिथे विद्यार्थ्यांना भत्तासुद्धा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.