नागपूर (Nagpur) : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Nagpur Metro-2) दुसऱ्या टप्प्याच्या सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता शहरापुरती मर्यादित असलेली मेट्रो लवकरच ग्रामीण भागापर्यंत धावणार आहे.
दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारासाठी 6 हजार 708 कोटी रुपयांचा सुधारित खर्च येणार आहे. याची लांबी 43.80 किलोमीटर राहणार असून याकरिता मार्गिका उभारावी लागणार आहे. पहिल्या टप्यात मिहान पर्यंत धावणारी मेट्रो पुढे बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत जाणार आहे. हे अंतर 19.65 किलोमीटरचे आहे.
ऑटोमेटिव्ह चौकातून मेट्रोला पुढे 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान नदीपर्यंत नेण्यात येईल. तसेच लोकमान्य नगरातून हिंगणा असा 6.65 किलोमीटर पर्यंत विस्तार केला जाणार आहे.
जानेवारी 2014 मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये 40.02 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 32 स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
मेट्रो रेल्वेच्या विस्तारामुळे हिंगणा, बुटीबोरी एमआयडी आणि कन्हान या दरम्यानची गावे शहराला जोडली जाणार आहे. मेट्रोच्या उपलब्धतेमुळे या परिसराच्या विकासाला गती येणार आहे.
बुटीबोरी आणि कन्हान एमआयडी येथे रोजगारासाठी शेकडो लोक शहराच्या विविध भागातून दररोज ये-जा करतात. मेट्रोमुळे त्यांना स्वस्त व नियमित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सोबतच ग्रामीण भागातून शहरात नोकरीसाठी जा-ये करणाऱ्या लोकांना आता नागपूर शहरात मेट्रो पोहचणे सुविधाजनक होणार आहे.