नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेतील (Nagpur Municipal Corporation) स्टेशनरी घोटाळ्यात सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले लेखा व वित्त अधिकारी यांच्या मोबाईलमधून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा घोटाळा दडपण्यासाठी एक नगरसेविकेने १५ लाख रुपयांची मागणी केली होती आणि पूर्ण करण्यात आल्याचे संभाषण त्यांच्या मोबाईलमध्ये आढळले आहे. या संभाषणाची क्लिप काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनासुद्ध ऐकवण्यात आली असल्याचे समजते.
स्टेशनरी घोटाळ प्रत्यक्ष उघड होण्यापूर्वी या नगरसेविकेने पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या प्रशासनावर आरोप केले होते. उदाहरणादाखल काही पुरावेसुद्धा सादर केले होते. याची दखल महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतली होती. महापालिकेच्या सभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. नगरसेविकेला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल असे आश्वासन सभागृहात देण्यात आले होते. त्यानंतर सुमारे दोन महिने खरेदी प्रकरण शांत झाले होते. या दरम्यान मोठी डील झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. मात्र याचे पुरावे कोणाजवळ नव्हते.
आरोग्य विभागातील काही देयके आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवायच काढण्यात आल्यानंतर हा घोटाळा खऱ्या अर्थाने चव्हाट्यावर आला. थेट पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात उडी घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी लेखा व वित्त विभागातील काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेचे लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांनाही अटक करण्यात आली. अटक झाली तेव्हा कोल्हे यांच्या निवृत्तीचे शेवटचे दोन दिवस शिल्लक होते. ते सध्या अटकेतच आहे. मात्र त्यांच्या मोबाईलमध्ये काही नगरसेवकांनी पैसे मागितल्याचे संभाषण रेकॉर्ड आहे. त्यात एका नगरसेविकेला १५ लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे.
ज्या नगरसेविकेचे यात नाव त्या सोशल मीडियावर अतिशय ॲक्टिव आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबध आहेत. एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या त्या नगरसेविका होत्या. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी आहे. मोठ्या पक्षातील इच्छुकांच्या भाऊगर्दीत विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळणे अवघड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वेगळी वाट धरली. मात्र स्वबळावर विधानसभा निवडूण येणे अशक्य असल्याने त्यांनी पुन्हा दुसऱ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला. त्यांनी प्रवेश केलेल्या पक्षात नागपूरमध्ये सध्या फारशी वर्दळ नाही. कसलेले कार्यकर्ते नाहीत. तुलनेत विधानसभेचे तिकीट मिळणे सोपे आहे. आधी महापालिका आणि नंतर विधानसभा अशी तयारी त्यांनी सुरू केली आहे. मात्र मोबाईलमधील संभाषण भविष्यात त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.