भंडारा (Bhandara) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रोंघा लोहारा पिटेसूर येथे रस्ता बनविण्यात आले. मात्र 3.770 किलोमीटर अंतराच्या रस्त्यादरम्यान अनेक खड्डे पडले आहेत. दोन महिन्यांतच या रस्त्यावर खड्डे पडल्याने या रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या संबंधित प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अनेक तक्रार करण्यात आली. तक्रार केल्यामुळे तपासणी व चौकशी करण्यात आली. त्यात डांबरी पृष्ठभागावर स्किडिंग होऊन दोन सेंटीमीटर कार्पेट क्षतीग्रस्त झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. तसेच या रस्त्याची क्षमता दहा टन वाहतुकीची आहे परंतू या रस्त्यावरून 40 ते 50 टन वजनाचे टिप्पर धावतात. त्यामुळे हा रस्ता क्षतीग्रस्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व कक्ष अधिकाऱ्यांकडे पुन्हा चौकशीची मागणी करण्यात आली. रोंघा, पिटेसूर, लोहारा सोरना, लंजेरा या रस्त्याची एकूण लांबी 8.590 किलोमीटर आहे. पिटेसूर रोंघा यादरम्यान 3.776 किमी रस्त्यावर 11/100 ते 12/100 लांबी रस्त्याची दुरावस्था झाली होती. अवघ्या दोन महिन्यांतच हा रस्ता उखडला. 3.39 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला होता. पण दोन महिन्यांतच रस्ता जगोजागी उखडून गेला त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत होता. आदिवासीबहुल गावांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता आहे.
या रस्त्याची तक्रार झाल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भंडारा यांनी चौकशी समिती नियुक्ती केली. त्या चौकशी समितीने, या रस्त्याची 10 टन क्षमता भार सहन करण्याची आहे असे सांगितले, परंतु या रस्त्यावरून 30 ते 40 टन वजनाचे टिप्पर दररोज धावतात, अशी रिपोर्ट सादर केली. तसेच हा रस्ता वळणमार्गाचा आहे. त्यामुळे डांबरी पृष्ठभागावर स्किडिंग होऊन दोन सेंटीमीटरचे 76 कार्पेट क्षतीग्रस्त झाले. असे नमूद केले आहे. या रस्त्याची राष्ट्रीय गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी करण्यात आली आहे. या रस्त्याची दुरुस्तीसुद्धा करण्यात आली आहे. चौकशी झाल्यानंतर सदर रस्त्याचे प्रकरण नस्तीबंद करावे, असे रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे. परंतु त्यानंतर या रस्त्याची तक्रार थेट मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व कक्ष अधिकारी विजयकुमार चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यात नागपूर येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंत्याकडून या रस्त्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित रस्त्याची चौकशी व तपासणीदरम्यान तक्रारकर्त्याला मोकास्थळी पाचारण करण्यात यावे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.