नागपूर (Nagpur) : बेला गावाबाहेरील कळमना टी पॉइंट ते सालईराणी कालव्यापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम तुकड्या तुकड्यांमध्ये ठेकेदारांना वाटून देण्यात आले असल्याने ते केव्हा पूर्ण होईल याची कोणालाच शाश्वती नाही. एकापेक्षा जास्त ठेकेदार नेमल्याने काम वेळेत होणे अपेक्षित होते. मात्र एक ठेकेदार आला की दुसरा पळतो अशी स्थिती असल्याने सहा महिन्यांपासून खड्डे व नाल्या खोदण्याचेच काम सुरू आहे.
रस्त्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आले असल्याने रोजच येथे अपघात होतात. बेला येथे नितीन गडकरी यांचा साखर कारखाना आहे. त्यामुळे उसाच्या ट्रकची येथे वर्दळ असते. याशिवाय इतर वाहनेही या मार्गावरून धावत असतात. उसाचा ट्रॅक्टरही खड्ड्यांमुळे उलटला आहे. मात्र कंत्राटदारास काही चिंता नाही. अधिकारीसुद्धआ काहीच मनत नसल्याने तो आणखीच बिनधास्त झाला आहे. रस्त्यापलीकडे राहणाऱ्या नागरिकांना नाली ओलांडून येणे जाणे करावे लागते. परंतु या उघड्या नाल्यांवर स्लॅब टाकण्यात आले नाही. त्यामुळे अनेकदा वृद्ध नागरिक आणि छोटी मुले नालीमध्ये पडतात. यातून जिवाचा धोका संभवतो. याबाबत अंदाजे एक-दीड महिन्यापूर्वी वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली होती. तरीपण कामाला वेग आला नाही.
नालीवर पूल टाकण्यासाठी ठेकेदाराने लोकांना पैसे मागितले. अशी ओरड ऐकायला येते. याबाबत कंत्राटदार लोखंडे यांना विचारणा केली असता नाली बांधकाम करण्याचे आदेश आहेत, नालीवर स्लॅब टाकण्याचे नाही,असे त्यांनी सांगितले. लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विमलाबाई तिडके शाळा, राजेंद्र उच्च प्राथमिक शाळा व इंग्लिश स्कूलचे खेड्यापाड्यातील असंख्य विद्यार्थी दुतर्फा मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असताना या रस्त्याने ये जा करतात.