लोणार (Lonar) : तालुक्यातील महारचिकणा परिसरामध्ये झालेल्या मॉन्सूनपूर्व पहिल्याच पावसात हारचिकणा नदीवरील तात्पुरता तयार केलेला रस्ता पाण्याच्या वेगाने वाहून गेला. त्यामुळे चार गावाचा संपर्क तुटला असून, कंत्राटदाराचा हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना अडचण निर्माण झाली आहे.
महारचिकणा फाटा ते कोनाटी हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्त्याचे काम चालू आहे. नदीवरील पुलाचे बांधकाम संथ गतीने चालू असल्यामुळे लगतच मुरूम टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. एक पावसातच रस्ता वाहून गेल्याने कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले आहे. कंत्राटदार सरकारी कामे थातूरमातूर करतात हे पुन्हा या निमित्ताने समोर आले आहे.
पाण्याच्या पुरामुळे रस्ता वाहून गेल्यामुळे महारचिकणा, कोनाटी, देऊळगाव कोळ या गावाचा संपर्क तुटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गावांमधून येणारा हा मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता असून शेतकऱ्यांनी खते व बी-बियाणे भरण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी पंचायत निर्माण झाले आहे. पेरणी सुरू होत असून शेतकऱ्यांना शेतात बियाणे व खते कसे न्यावे हा प्रश्न शेतकर्यांना व ग्रामस्थांना पडला आहे. नदीवरील पुलाचे काम संथ गतीने चालू असून संबंधित कंत्राटदाराने व प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर पर्यायी रस्ता द्यावा ही ग्रामस्थांना व प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.