नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सुमारे १२५ कोटींच्या रोखे घोटाळ्याची सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांच्यावर या घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारचे एकूण १५ घोटाळे असल्याने सर्वांची एकत्रितच सुनावणी केली जाणार आहे.
सुनिल केदार मुख्य आरोपी असलेला या घोटाळ्यावर सुमारे २० वर्षांपासून सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्यात शिंदे सेना आणि भाजपची सत्ता आल्यानंतर जे.एन. पटेल यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निकालावर केदारांचे भवितव्य अवलंबून होते. आता अचानक हा खटला मुंबईत वर्ग करण्यात आला.
सर्व खटल्यांमधील आरोपींवर दोन महिन्यात आरोप निश्चित करावे आणि दोन वर्षात ते निकाली काढावे असा आदेश न्यायामूर्ती जे.के. माहेश्वरी यांनी दिला आहे. हा घोटाळा झाला तेव्हा केदार आमदार आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. घोटाळ उघडकीस आल्यानंतर केदार यांना अटकही करण्यात आली होती. केदारांचे यामुळे राजकीय नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा भरारी घेतली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ते पशु संवर्धन व क्रीड मंत्री होती. राज्याच्या सहकार विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. त्यात अनेक आरोपी अडकणार असल्याची शक्यता आहे.