चंद्रपूर (Chandrapur) : नागपुरातील नाग नदीच्या विकासासाठी केंद्र सरकारने विशेष निधी दिला आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूरची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या इरई आणि झरपट नद्यांवर 9 बंधारे, सुरक्षा भिंती आदींच्या विकासाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या कामात पाटबंधारे विभाग, सीटीपीएस, पर्यावरण विभाग, म्हाडा आदी विभाग सहभागी होणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी इरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षणास तसेच झालेल्या विद्रुपीकरणास वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) हेच जबाबदार आहे, असे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केले होते. दरम्यान वेकोलिने दोन्ही नद्यांचे खोलीकरण करावे, संरक्षण भिंत बांधावी, पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य करावे, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली होती.
इरई व झरपट नदी प्रदूषित होत आहे. या दोन्ही नद्यांचे अस्तीत्व संपुष्टात येत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढला आहे. अनेक छोट्या पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मार्ग बंद झाले आहेत.
नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. इरई धरणाचे दरवाजे सातत्याने उघडले जात असल्याने इरई व झरपट नदीला देखील पाणी आहे. तर अनेक छोटे मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशात नद्यांचे खोलिकरण आणि स्वच्छता करणे फार आवश्यक आहे.
नियोजन भवनात आयोजित पत्रपरिषदेत मुनगंटीवार यांनी विविध योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाले आहेत. आणखी पाऊस पडणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य होणार नाही. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल.