चंद्रपूर (Chandrapur) : मध्य रेल्वे नागपूर वाणिज्य विभागातील नॉन-फेअर रेव्हेन्यू (एनएफआर) कक्षाने बल्लारशाह तसेच चंद्रपूर रेल्वेस्थानकांवर प्रवासी व वाहतूक वाढविण्यासाठी प्रत्येकी दोन बॅटरीचलित गाड्या तीन वर्षांच्या कंत्राटीवर उपलब्ध करून दिल्या. फलाटावर धावणाऱ्या या गाडीतून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना रेल्वे डब्यापर्यंत पोहोचण्यातील अडचण दूर होणार आहे.
बल्लारशाह रेल्वे जंक्शन हे मध्य रेल्वेचे शेवटचे व अत्यंत वर्दळीचे स्टेशन आहे. या स्टेशनवर देशभरात धावणाऱ्या सर्व सुपरफास्ट गाड्या थांबतात. याच स्टेशनवर टीटीआय व लोको पायलट स्टाफ बदलतो. शिवाय, रेल्वे गाड्यांची देखरेख केली जाते. त्यामुळे बल्लारपूर स्टेशनला मध्य रेल्वेमध्ये विशेष महत्त्व आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत या स्टेशनच्या विकासासाठी 34 कोटींची तरतूद करण्यात आली. बरीच कामे देखील सुरू आहेत. त्यामुळे दिवसाआड रेल्वे विभागाचे विभागीय अधिकारी पाहणीसाठी स्टेशनवर येतात. दररोज हजारो प्रवासी स्टेशनवर येतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांची संख्याही बरीच असते. या प्रवाशांना फलाटावर चालणे अवघड होते.
गाडी आल्यास डब्यापर्यंत जाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागतो. या समस्येवर पर्याय म्हणू रेल्वे प्रशासनाने बॅटरीवर चालणाऱ्या बल्लारशाह व चंद्रपूर स्टेशनवर प्रत्येकी दोन अशा एकूण चार गाड्या फलाट क्रमांक एकवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
या गाडीवर लागणार शुल्क
प्रवाशांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, गाडी आल्यानंतर डब्यापर्यंत आपल्या सामानासोबत सुरक्षित जाण्यासाठी या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला. ही सेवा पुरविताना प्रवाशांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा
मध्य रेल्वेचा हा उपक्रम ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. बॅटरीच्या साहाय्याने फलाटावर धावणारी ही चारचाकी कार काही दिवसांपासून स्टेशनवर उभी आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी केव्हा रूजू होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे. बल्लारशाह स्टेशनवर बॅटरीचलित दोन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. या कामाचे टेंडर देण्यात आले आहे, अशी माहिती जयकरणसिंग बजगोती, माजी डीआर यूसीसी सदस्य, मध्य रेल्वे, बल्लारशाह यांनी दिली.