नागपूर (Nagpur) : भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आढावा घेतला. हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर व आसपासच्या शहरामधील होतकरु खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने साईचे केंद्र नागपुरात सुरू करण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात पूर्व नागपुरातील वाठोडा परिसरातील जागा निश्चित करण्यात आली. या जागेवर साईचे केंद्र व राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सद्य:स्थिती, तसेच येणाऱ्या अडचणी व यासंदर्भात गडकरींनी बैठक घेतली. यावेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, साईच्या नागपूर प्रकल्पातील अधिकारी उपस्थित होते.
या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने व्हायला हवी. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या जागेवर कुणाचे अतिक्रमण असेल तर ते तातडीने हटवा. या कामांमध्ये दिरंगाई होता कामा नये, असे गडकरी यांनी स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना निर्देश दिले. साईचे केंद्र सुरु झाल्यास आजुबाजुच्या गावातील खेळाडूंना याचा जास्त फायदा होईल. त्यांना सुरूवाती पासुनच योग्य प्रशिक्षण मिळाल्यास चांगले खेळाडू बनतील.