नागपूर (Nagpur) : रायपूर व हिंगणा शहराला जोडणारा आणि 1962 मध्ये निर्माण केलेला वेणा नदीवरील जुना पूल भग्नावस्थेत आहे. पुलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. हिंगणा तालुक्यातील लोकवाहिनी म्हणून ओळखली जाणारी वेणा नदी आहे. सन 1962 मध्ये वेणा नदीवरील पहिल्या पुलाचे उद्धघाटन तत्कालीन मंत्री बॅरी. शेषराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून या एकेरी पुलावरून वाहतूक सुरू झाली.
नंतरच्या काळात सन 2007 मध्ये पुन्हा नवीन पूल बांधण्यात आला. या पुलाचे बांधकाम खरे आणि तारकुंडे कन्स्ट्रक्शन कंपनीने केले होते. यानंतर या पुलावरून दुहेरी मार्ग सुरू झाला. जुन्या पुलाला जवळपास 60 वर्षाचा कालावधी लोटला आहे. मागील दीड वर्षापासून हिंगणा मार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. हिंगणा नाक्यापासून हिंगणा आऊटररिंग रोडपर्यंत सिमेंट रस्त्याची बांधकाम सुरू आहे. ज्या ठिकाणी जुने पूल आहेत. त्या ठिकाणी पुलाची दुरावस्था झाली असतानाही कंत्राटदाराने दुर्लक्ष केले आहे. अशा दुरवस्था झालेल्या पुलावरून अद्यापही वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. हिंगणा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता या पुलावरून दररोज जाणे-येणे करतात. मात्र त्यांनाही या पुलाची दुरवस्था दिसलेली नाही, हे विशेष. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष या पुलाची पाहणी करावी. जुना पूल असल्याने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. यानंतर तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जनतेत जोर धरत आहे.
अपघाताची शक्यता वाढली
वेणा नदीवरील नवीन पुलाची आता रंगरंगोटी करण्यात आली. मात्र दुरवस्था झालेल्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीकडे (वर्धा) सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. सद्यःस्थितीत या पुलावरील लोखंडी सळाखीही उघड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत या पुलाला भगदाड तर पडणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.