नागपूर : जनतेने निवडून देऊन तुम्हाला सेवेची संधी दिली. त्यामुळे निव्वळ टक्केवारीच्या मागे लागू नका, असे सांगून केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेतील पदाधिकारी आणि भाजपच्या नगरसेवकांचे कान टोचले.
महापालिकेत पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. अलीकडे अनेक पदाधिकाऱ्यांवर टक्केवारी घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा आरोप आहे. काही कंत्राटदारांनी थेट गडकरी यांच्याकडे काम देण्यापूर्वीच टक्का मागितला जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. हाच धागा पकडून गडकरी यांनी इंदिरा गांधी सभागृह मैदानात अमृत योजनेंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या सक्करदरा, ताजबाग, वंजारीनगर भागातील जलकुंभांच्या कामाचे भूमीपूजनाप्रसंगी नगरसेवकांची कानउघाडणी केली.
महापालिकेचा कार्यकाळ संपायला चार महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येकाला कामांची घाई झाली आहे. कोरोनामुळे वर्षभर कामेच होऊ शकली नाहीत. तत्पूर्वी तुकाराम मुंडे आयुक्त असताना त्यांनी एकाही नवीन कामाला निधी दिला नाही. आधी जुनी दिल्याशिवाय नवीन कामांना मंजुरी देणार नाही अशी ताठर भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे नगरसेवक चांगलेच अस्वस्थ झाले होते. त्यांची बदली झाल्यानंतर सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या निधी आपआपल्या प्रभागात खेचून नेण्याची स्पर्धा लागली आहे. ही संधी साधून काही पदाधिकाऱ्यांनी आपली टक्केवारी वाढविली आहे. महापालिकेतील एक पदाधिकारी थेट कंत्राटदालाचा आपल्या कक्षात बोलवून काम पाहिजे असेल तर इतके टक्के द्यावे लागेल अशी मागणी करीत आहे. महापालिकेतील या टक्केवारीची चांगलीच चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. काही कंत्राटदारांनी कंटाळून गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.
टक्केवारीची महापालिकेत परंपराच आहे. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. जे काँग्रेसने केले तेच भाजपही करीत आहेत. मात्र पूर्वी टक्केवारीला मर्यादा होती. हावरटपणा कमी होता. आता होणाऱ्या कमाईतील मोठा वाटा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाच द्यावा लागतो. त्यामुळे कामे कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादे काम निकृष्ट झाले तर कारवाई आणि तक्रारण्यासाठी टक्केवारी मागणारेच आघाडीवर असतात. त्यामुळे अनेक कंत्राटदार आता महापालिकेत काम करायला तयारच होत नाही, असे महापालिका कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांनी सांगितले.