नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेचे (Nagpur Municipal Corporation) केव्हा काय गायब होईल, याचा काही नेम राहिला नाही! आता प्रभाग आणि उद्यानांमध्ये बसण्यासाठी वापरली जाणारी सुमारे पाच हजार बाके गायब झाल्याचे समोर आले आहे. ही बाके कुठे गेली, याचा शोध घेतला जात असून, यातून काही कोटींचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी नगरसेवकांना नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेमार्फत बाके उपलब्ध करून दिली जातात. ती नगरसेवकाच्या शिफारशीवर प्रभागात ठिकठिकाणी बसविली जातात. मागील वर्षी १७ हजार ५६२ बाके वाटपाचे कंत्राट देण्यात आले होते. यावर ११ कोटी ९१ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. प्रत्यक्षात १२ हजार बाकांचेच वाटप झाले आहे. त्यामुळे इतर बाके कुठे गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाकांसाठीचा ११ कोटी ९१ लाख रुपयांचा खर्च महापौर निधी, स्थायी समिती आणि दुर्बल घटक समितीच्या निधीतून करण्यात आला आहे. खर्च झालेला निधी बघून महापालिका आयुक्तसुद्धा चक्रावले आहेत. त्यांनीच या बाकांचा शोध घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या महापालिकेत प्रशासक म्हणून राधाकृष्णन बी. कार्यभार बघत आहे. कुणाचीच सत्ता नसल्याने त्यांच्यावर राजकीय दबावसुद्धा नाही. मात्र निवडणूक जाहीर झाल्यावर बाकांचा घोटाळा समोर आल्यास सत्ताधारी भाजप अडचणीत येऊ शकते.
बाके बनवण्याचे कंत्राट शहरातील काही विशिष्ट कंत्राटदारालाचा दिले जाते. हा कंत्राटदार शहरातील एक मोठ्या नेत्याचा भाऊ असल्याचे समजते. अनेक वर्षांपासून एकाच कंत्राटदारामार्फत बाके तयार केली जात आहे. दरवर्षी बाके वितरित होतात आणि त्यातील काही गायब होतात. याचा काहीच हिशेब नसतो. त्यामुळे बाकांच्या कंत्राटामागे मोठे अर्थचक्र फिरत असते. बाके तयार करण्याची ऑर्डर आणि प्रत्यक्ष वाटप, यात मोठी तफावत असते. यावेळी चौकशीच्या माध्यमातून ती समोर येण्याची शक्यता आहे.