Bhandara News भंडारा : धान खरेदी अपहार प्रकरणात तीन केंद्रचालकांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सरकारच्या आधारभूत किंमत योजनेनुसार चार वर्षांपूर्वी झालेल्या 58 हजार 890.76 क्विंटल धानाच्या खरेदी मध्ये अपहार करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासानंतर आता विलंबाने का होईना, पण अटक झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात केंद्रचालक सरांडी (बु) येथील नीलेश ठाकरे व पिंपळगाव (को) येथील दिनेश परशुरामकर आणि विनोद परशुरामकर यांचा समावेश आहे. गुरुवारी (ता. 24) सायंकाळी तिन्ही केंद्र संचालकांना अपहाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली.
लेखापरीक्षण अहवालानुसार, चार वर्षांपूर्वी झालेल्या 58 हजार 890.76 क्विंटल धानाच्या खरेदीत अपहार झाल्याचे 2021 मध्ये उघड झाले होते. त्यावरून विविध कलमाखाली चारही केंद्र चालकांविरुद्ध भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात एकाने न्यायालयातून जामीन मिळविल्याने आता उर्वरित तीन केंद्रचालकांना अटक करण्यात आली आहे.
वर्ष 2019-20 मध्ये लाखांदूर येथील दि सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्था अंतर्गत खरीप व रब्बी अंतर्गत धान खरेदीसाठी चार खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. या केंद्रात सरांडी (बु) येथील दोन व भागडीसह पिंपळगाव (को) येथील प्रत्येक एक केंद्र समावेश होता. सरांडी (बु) येथील एका खरेदी केंद्र अंतर्गत 5002.76 क्विंटल धानाची हेतुपुरस्पर नासाडी करण्यात आल्याचा ठपका अहवालातून ठेवण्यात आला होता.
सरांडी (बु) येथीलच अन्य एक केंद्रासह भागडी व पिंपळगाव (को) येथील केंद्रांतर्गत सुमारे 888 क्विंटल धानाची तूट आढळून आल्याचे अहवालात म्हटले होते. विशेष म्हणजे लेखापरीक्षण अहवालातून या बाबी स्पष्ट झाल्यावर 1 कोटी 41 लाख रुपयांच्या एकूण 5880.76 क्विंटल धानाचा अपहार झाल्याचा आरोप करून संबंधित केंद्र चालकांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती. आता दोन वर्षाने का होईना संचालकवर कारवाई झाल्याने शेतकरी आनंदी आहेत, तर अजून कठोर शिक्षा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.