भंडारा (Bhandara) : गरजू व गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी तुमसर नगर परिषदेने शहरातील आंबेडकर नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभारले आहे. त्या स्मारकाच्या पहिल्या माळ्यावर ई-वाचनालयाची अत्याधुनिक वास्तू नगरपालिकेने उभारली आहे. 1 कोटी 80 लाख रुपये खर्च करून पहिल्या माळ्यावर आलिशान वाचनालयाची इमारत उभारण्यात आली आहे. एकाचवेळी शेकडो मुले व मुली अध्ययन करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, हे ई - वाचनालय लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.
वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करता यावी, यासाठी येथे अभ्यासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र वर्गखोली व कॉन्फरन्स हॉल, लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष, इतर परीक्षार्थीसाठी अध्ययन साहित्य, मार्गदर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. परंतु, देखभालीसाठी ही वास्तू आंबेडकर स्मारक समितीकडे की नगरपालिकेकडे हस्तांतरित होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वाचनालय तब्बल 5 विभागांत मोडणारी वास्तू असून, विदर्भातील पाहिली ई-लायब्ररी असेल ती विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. वाचनालयात प्रोजेक्टर हॉल, संगणक लॅब, कमिटी चेंबर बैठक भवनसह प्रशिक्षणार्थीकरिता भव्य वाचन कक्षाचे नियोजन केले आहे. पुस्तकांचा मुबलक संग्रह करण्याकरिता मोठ्या अलमाऱ्या, बसण्याकरिता टप्प्यानिहाय गोलाकार रचना आहे.
सम्राट अशोक यांच्या चक्राखाली येथील विद्यार्थी ज्ञानामृत घेणार असून, या अत्याधुनिक सुसज्ज वाचनालयातून अनेक शैक्षणिक पिढ्या घडणार आहेत. परंतु, या वाचनालयाचे उद्घाटन कधी पार पडणार, अशी चर्चा नागरिकांत रंगली असून, कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली वाचनालयाची इमारत वापराविना आहे.