भंडारा (Bhandara) : भंडारा शहरातील खांबतलाव पूर्वीच्या काळापासून धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. या तलावात मध्यभागात एक दगडी खांब असल्यामुळे या तलावाचे नामकरण खांबतलाव असे झाले आहे. येथे सणासुदीच्या काळात मूर्तींचे व पूजेच्या साहित्याचे तलावात विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होऊन तलावाचे क्षेत्र मर्यादित झाले होते.
नगर परिषदेच्या प्रयत्नातून या तलावात मूर्ती व पूजेचे साहित्याचे विसर्जन न करता त्याकरिता कृत्रिम हौद बनविण्यात आला. त्यानंतर या तलावाचे सौदर्यीकरणाच्या कामात सभोवताली भिंती, पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर पर्यटन विकास महामंडळ आणि लोकप्रतिनिधींच्या निधीतूनही काम करण्यात आले आहे.
खासदार सुनील मेंढे यांनी या कामासाठी केंद्रातूनही निधी मिळवून दिला आहे. येथील कारागृहाच्या मागील भागातून आलेला भंडारा-बालाघाट हा मार्ग खांबतलावाच्या काठावरून गेला आहे. रामटेक, गोंदिया, तुमसरकडे जाणारी प्रवासी वाहने याच मार्गाने जातात. तसेच या मार्गावरून रेल्वे स्टेशनमध्ये जाणारी वाहनेसुद्धा जातात. मात्र, चौकासह शेजारचा बगीचा आणि तलाव असूनही तेथे आकर्षक असे काहीच नव्हते.
स्थापित होणार 51 फूट उंच श्रीरामची मूर्ती
आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी याच तलावाच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलावात 51 फूट उंच श्रीरामाची मूर्ती व इतर कामांचा आराखडा तयार करून त्याकरिता सरकारकडून 19 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. यातून आकर्षक असा राम झुला, म्युझिकल फाउंटन आणि इतर अनेक कामे करण्यात येणार आहेत.
भगवान रामपुरे या मूर्तीकरांकडे मूर्ती तयार करण्याचे काम दिले असून, ही मूर्ती हलक्या धातूपासून बनविण्यात येणार आहे.