नागपूर (Nagpur) : मिहान-सेझमधील बाबा रामदेव (Ramdev Baba) यांच्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कमधील पहिल्या टप्प्यातील फ्लोअर मिल सुरु करण्याचा मुहूर्त आतापर्यंत चार वेळा हुकला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेकदा अल्टिमेटम दिले आहेत. आघाडी सरकारच्या काळात वीज पुरवठ्याची अडचण पुढे करून मुहूर्त टाळला होता. तो विषय मार्गी लागला असल्याची माहिती असून आता नवीन अडचण काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
सप्टेंबर, डिसेंबर २०२१, मार्च २०२२ मध्ये पतंजली फ्लोअर मिल सुरु करणार असल्याचे म्हटले जात होते. हे सर्व मुहूर्त हुकल्यानंतर नवीन तारीख सांगितल्यानंतरही प्रकल्प सुरु होईलच अशी शक्यता धूसर आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दल विदर्भातील नवयुवकांचा भ्रमनिरास झालेला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन १० सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यावेळी एक हजार ते १२०० कोटींच्या गुंतवणुकीतून विदर्भातील १० हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली होती. पाच वर्षांनंतरही प्रकल्पात मशिनरीची उभारणी झालेली नव्हती. आता प्रकल्पाला हळू हळू वेग येऊ लागला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी डिसेंबरच्या प्रारंभी प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली, तरीही उत्पादन खरंच सुरू होणार का आणि विदर्भातील युवकांना रोजगार मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिहान-सेझमध्ये सर्वाधिक रोजगार देणारा प्रकल्प म्हणून पतंजलीची ओळख निर्माण झाली होती; पण ओळख हळूहळू पुसट झाली. पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी पतंजलीचा प्रकल्पाचा आढावा घेतला. तेव्हा पतंजलीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने फ्लोअर मिल सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, कालावधीबद्दल निश्चितता व्यक्त केलेली नाही. यामुळे पतंजली प्रकल्प कधी सुरु होणार याबद्दल अनिश्चिततेचे सावट अद्यापही कायम आहे.
पतंजलीला २३२ एकर जमीन सेझमध्ये आणि ३२ एकर जमीन सेझबाहेर देण्यात आली आहे. पायाभूत बांधकाम पूर्वीच झाले आहे. फ्लोअर मिलच्या मशिनरीही आलेल्या आहेत. पहिल्या टप्यात फ्लोअर मिल सुरु करणार असून दुसऱ्या टप्प्यात ज्यूस पार्क सुरु करण्याचा मानस आहे.