बुलडाणा ः बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा (ता. संग्रामपूर) गावासाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना अधिकाऱ्यांमुळे रखडली आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांसह उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
पातुर्डा गावची लोकसंख्या १६ हजार आहे. संपूर्ण गावाला विहीर व बोरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. परंतु गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरपंच शैलजा भोंगळ यांनी संगीतराव भोंगळ यांच्या नेतृत्वात सतत पाठपुरावा केला. ग्रामस्थांसोबत आंदोलन केले. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अंदाजे १६ किलोमीटर पाइपलाइन व तीन लाख २० हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीसाठी २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपये निधी मंजूर झाला. ८ नोव्हेबर २०२१ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने ई-टेंडर काढण्यात आले.
एका पत्राचा संदर्भ देत अधिकाऱ्यांनी दबावाखाली हेतुपुरस्सरपणे हे ई-टेंडर रद्द केले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना प्रत्यक्ष भेटून पाणी समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. शिंगणे यांच्या निर्देशानुसार पुन्हा ई फेर-टेंडर काढण्यात आले. मात्र प्रत्यक्ष काम सुरू न केल्याने मंजूर पाणीपुरवठा योजना रखडली.
येत्या काळात भीषण पाणीटंचाई होऊ शकते. हे टाळण्यासाठी व पातुर्डा गावातील प्रत्येक परिवाराला वारी हनुमान धरणातील शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अखेरीस आता या प्रश्नावर उपोषणही सुरू केले. आता न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही.
- संगीतराव भोंगळ, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, बुलडाणा