नागपूर (Nagpur) : मागील पंधरा ते वीस वर्षांपासून नागपूर महापालेकत संगणक ऑपरेटर म्हणून काम करणारे सुमारे पावणे दोनशे कर्मचारी कार्यालयाऐवजी संविधान चौकात आंदोलन करीत आहे. महापालिकेने संगणक ऑपरेटरचा ठेकेदार बदलला आहे. त्यामुळे जुन्या ऑपरेटरची नोकरी जाणार आहे.
नागपूर महापालिकेचे प्रशासन ठेकेदार बदलणार असल्याने अनेक दिवासांपासून ऑपरेटरमध्ये अस्वस्थता आहे. निवेदने, निषेध केल्यानंतर त्याची दखल घेतली जात नाही. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी त्यांना भेटण्याचेही टाळत आहेत. खालच्या अधिकाऱ्यांना निवेदने द्या, चर्चा करा असे सांगत आहे. विशेष म्हणजे भाजपचाच एक नेता नव्याने कंत्राट काढण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे.
महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक चालक म्हणून १८९ संगणक चालक कार्यरत आहेत. यापैकी अनेक जण सुमारे १५ ते २० वर्षांपासून आहेत. त्या सर्वांची सेवा समाप्त केली जाणार आहे. त्यासाठी नवे कंत्राट काढण्यात येणार आहे. नव्याने भरती केल्या जाणाऱ्या संगणक चालकांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यांना किमान वेतन कायद्यापेक्षा कमी १५ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. सध्याच्या संगणक चालकांना २० हजार ६६६ रुपये वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निर्वाह निधी कापला जातो, तसेच ईएसआयसीची सुविधाही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. ही सेवाही नव्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी विरोध केला होता. विद्यमान मुख्यमंत्री तसेच तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाश शिंदे यांनाही हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच एक अपिलही राज्य सरकारकडे दाखल केले होते. त्याचा निर्णय अद्याप आला नसल्याने महापालिकेने पुन्हा नवे कंत्राट काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.