नागपूर (Nagpur) : विदर्भातील पंचतारांकीत औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुटीबोरीत एक हजार कोटींची तर उमरेड येथे ५०० कोटींची गुंतवणुक केली जाणार आहे. दावोस येथे आयोजित आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांतील २३ कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. यात विदर्भातील सहा कंपन्यांचा समावेश आहे. विदर्भात ३ हजार ५८७ कोटींची गुंतवणूक होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आर्थिक परिषदेदरम्यान महाराष्ट्र दालनात सामंजस्य करार झाले. विविध करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती-तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्याशिवाय विदर्भातील इंडोरामा, जीआर कृष्णा फेर्रो एलॉयज प्रायव्हेट लिमिटेड, कलरशाइन इंडस्ट्रीज, गोयल प्रोटिन्स लिमिटेड, अल्प्रोज इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, विश्वराज एन्व्हॉयर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांनी बुटीबोरी, मूल, उमरेड, अतिरिक्त बुटीबोरी, चंद्रपूर येथील एमआयडीसीमध्ये प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे.
याशिवाय अमरावतीमधील टेक्स्टाईल्स पार्क येथेही टेक्स्टाईल इंडस्ट्री येणार आहे. गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या या टेक्स्टाईल्स, स्टील, फ्युएल इथेनॉल, ऑइल एक्स्ट्रॅक्शन क्षेत्रातील आहेत. या सर्व कंपन्यांमुळे ४ हजार ८३४ जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. दावोस येथील परिषदेत सामंजस्य करार करण्यात आला.' सामंजस्य करारप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आदी उपस्थित होते.
कंपनीचे नाव - क्षेत्र - गुंतवणूक - रोजगार - स्थळ
इंडोरामा-टेक्स्टाईल्स - ६०० कोटी - १५०० - बुटीबोरी
गोयल प्रोटिन्स-ऑइल एक्स्ट्रॅक्शन - ३८० कोटी - ५३४ - अतिरिक्त बुटीबोरी
कलरशाइन इंडिया-स्टील - ५१० कोटी - ५०० - उमरेड
जीआर कृष्णा फेर्रो एलॉयज - स्टील - ७४० कोटी - ७०० - मूल
कार्निव्हल इंडस्ट्रीज - फ्युएल इथेनॉल - २०७ कोटी - ५०० - मूल
अल्प्रोज इंडस्ट्रीज - १५० कोटी - ५०० - अमरावती टेक्स्टाईल्स
विश्वराज एन्व्हॉयर्नमेंट - १००० कोटी - ६०० - चंद्रपूर