नागपूर (Nagpur) : बांधकामाचा मलबा कुठे टाकावा ही डोकेदुखी आता संपणार आहे. एवढेच नव्हे तर या मलब्यातून रेती तयार केली जाणार असून, नागपूर महापालिकेला त्यातून उत्पन्न सुद्धा मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी महापालिकेने हैदराबादच्या एका खाजगी कंपनीसोबत करार केला आहे.
शहरात बांधकाम व पाडाव कचरा महापालिकेसाठी डोकेदुखी ठरला होता. बांधकामातील विटा, सिमेंट, रेती घेऊन जाण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागत होता. आता शहरात दररोज तयार होणाऱ्या या कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून, यातून रेतीही तयार केली जाणार आहे. आतापर्यंत रेती केवळ नदीतूनच येते, एवढेच सर्वांना माहित होते. महापालिकेने या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी रामकी एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेडअंतर्गत कार्यरत हैदराबाद सी अँड डी वेस्ट कंपनीसोबत करार केला आहे.
महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत मनपाचे अधिकारी तसेच कंपनीचे वरिष्ठ सहायक व्यवस्थापक माधवी जी. यांनी करारावर स्वाक्षरी केली. ही कंपनी बांधकाम व घर पाडल्यानंतर झालेल्या कचऱ्यातून कंपनी रेतीच नव्हे तर विटा, आयब्लॉक, टाईल्सही तयार करणार आहे. कंपनीला प्रक्रिया युनिट तयार करण्यासाठी मनपातर्फे भांडेवाडी येथे ५ एकर जमीन देण्यात आलेली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी शुक्रवारी जमिनीची पाहणी सुद्धा केली. यावेळी उपअभियंता राजेश दुफारे, रामकी एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेडचे व्यवस्थापक मेहबूब सुभानी शेख, कनिष्ठ अभियंता प्रशांत वाघमारे, सल्लागार मेसर्स आर. जगताप अँड असोसिएटचे यादव उपस्थित होते.
दररोज दोनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया
कंपनी दररोज जवळपास २०० टन सी अँड डी कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. यातून बांधकामाला रेती, विटा, पेव्हर ब्लॉक, टाईल्स बनविण्यात येणार आहे. सी अँड डी कचरा शहरातून गोळा करण्यासाठी संपूर्ण पायाभूत सुविधांची व्यवस्था कंपनी करणार आहे. अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शहरात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांवर, निवासी भागातील सी अँड डी कचरा पूर्णपणे कमी होईल. यामुळे नागपूर शहर अधिक स्मार्ट आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.