अमरावती (Amravati) : चांदूर बाजार येथील नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प धूळखात पडून आहे. पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांकडून केली जात आहे.
नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री अनिल बोंडे यांनी 17 ऑगस्ट 2019 रोजी केले होते. साडेपाच वर्षे कालावधी पूर्ण झाले असताना, यात कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आले नाही. हा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, हे विशेष. दुसरीकडे मोर्शी मार्गावर स्थानिक क्रीडा संकुलनजीकच्या मटण मार्केटजवळ कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. यामुळे हा बाजारच रस्त्यावर आला आहे. बाजूला असलेल्या क्रीडा संकुलमध्ये विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींच्या आरोग्याला या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून धोका आहे. या प्रकल्पात लागलेली कोट्यवधीची यंत्रे फक्त शोपीस ठरली आहेत.
आता तर अनेक यंत्रे गायब झाली असल्याची चर्चा आहे. इमारती क्षतिग्रस्त झाल्या आहेत. या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारून कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
ग्रामस्थांचा विरोध :
जसापूर ग्रामपंचायतीकडून कुठलीही परवानगी न घेता तत्कालीन नगरपरिषद प्रशासनाने प्रकल्प उभारला. नंतर काही अटी-शर्तीवर ग्रामपंचायतीने प्रकल्पाला ना-हरकत दिली. या अटी-शर्तीचे पालन न झाल्याने ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी प्रकल्पाला विरोध केला. जसापूर ग्रामपंचायतकडून नगर परिषदेला अनेक वेळा पत्रव्यवहार झाला, तरी प्रकल्प त्या ठिकाणाहून हटविण्यात आला नाही.
प्रकल्पाला जसापूर ग्रामपंचायतीबरोबर नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे तो प्रकल्प बंद आहे. मटण मार्केटमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यासंदर्भात दुसऱ्या ठिकाणी जागा प्रस्तावित करण्यात येत आहे. लवकरच दुसऱ्या ठिकाणी कचरा हलविण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नगर परिषद, चांदूर बाजारचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी दिली.