अमरावती (Amravati) : थकीत रकमेपैकी 48 लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर महाराष्ट्र बँकेने महापालिकेला अखेर कन्सेंट लेटर देण्यास होकार भरला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील तो बँकिंग व्यवहार पूर्ण झाल्याने 6 जून रोजी प्रशासनाच्या वतीने नव्या शहर बस अभिकर्त्याला वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यामुळे 1 मार्चपासून बंद पडलेली शहर बस सेवा 8 जूनपासून पूर्ववत झाली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी शहर बसच्या जुन्या कंत्राटदाराचा करारनामा रद्द करून लगेचच नवा कंत्राटदार देखील नेमला. मात्र जोपर्यंत 2 कोटी 35 लाख 36 हजार 180 रुपये थकीत कर्जाचा भरणा केला जात नाही, तोपर्यंत बँकेने ना हरकत देण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेचे थर्ड पार्टी अॅग्रिमेंटचे घोडे अडले. त्यामुळे महापालिका प्रशासन बँकेविरोधात उच्च न्यायालयात गेले होते.
म्हणून बँकेचा होकार
किमान 30 टक्के रक्कम भरल्यावर बॅंक करारनामा करण्यास कन्सेंट देईल, असे बँकेने कळविले. त्यानुसार मनपाने 48.40 लाख रुपये बँकेला तातडीने द्यायचे होते, तर 10 टक्के रक्कम नव्या कंत्राटदाराला द्यायची होती. त्यानुसार, मनपाने 48.40 लाख रुपये बँकेला दिले.
नवा बस अभिकर्ता मनपाला शहर बस रॉयल्टी म्हणून प्रतिकिलोमीटर 5.23 रुपये देणार आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून कार्यशाळेत उभ्या असलेल्या 17 बसेसची डागडुजी अंतिम टप्प्यात आहे.